रिलायन्स कॅपिटलमार्फत २,५०० कोटी उभारणी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहातील कंपन्यांवरील कर्जभार कमी करण्याच्या प्रयत्नांना गती मिळत आहे. समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या स्थावर मालमत्ता विकण्यात आल्या आहेत. तर रिलायन्स कॅपिटलमार्फत २,५०० कोटी उभारण्यात आले आहेत.

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने तिच्या दिल्ली तसेच चेन्नईतील मालमत्ता विकल्या आहेत. कॅनडास्थित ब्रुकफिल्डला या मालमत्ता विकण्याच्या प्रस्तावाला कंपनीने मान्यता दिल्याचे कळते. याद्वारे ८०१ कोटी रुपये उभारले गेल्याची शक्यता आहे.

एकटय़ा रिलायन्स कम्युनिकेशन्सवर ४५,००० कोटी रुपयांचा कर्जभार आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात तिची २जी तसेच ३जी तंत्रज्ञानावरील दूरसंचार सेवा गुंडाळण्याचे जाहीर केले होते. कंपनीचे एअरसेलबरोबरचे विलीनीकरणही फिस्कटले आहे.

कर्ज पुनर्बाधणीच्या माध्यमातून रिलायन्स कॅपिटलने बँका तसेच वित्तीय संस्थांमार्फत २,५०० कोटी रुपये उभारल्याचे सांगण्यात येते. मुदत कर्ज तसेच अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून ही रक्कम उभारली गेली आहे. ५ ते ७ वर्षे मुदतीसाठी हे कर्ज असेल.

ग्राहक वित्त, दलाली, संपत्ती व्यवस्थापन, म्युच्युअल फंड तसेच वित्तीय उत्पादने विक्रीत रिलायन्स कॅपिटल आघाडीवर आहे. कंपनीने रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट (म्युच्युअल फंड) मार्फत प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेतून नुकतेच १,५४२ कोटी रुपये उभारले आहेत. याद्वारे २.४५ कोटी समभाग नव्याने देऊ करण्यात आले होते.

कर्ज पुनर्बाधणीच्या माध्यमातून रिलायन्स कॅपिटलने बँका तसेच वित्तीय संस्थांमार्फत २,५०० कोटी रुपये उभारल्याचे सांगण्यात येते. मुदत कर्ज तसेच अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून ही रक्कम उभारली गेली आहे. ५ ते ७ वर्षे मुदतीसाठी हे कर्ज असेल. अनिल अंबानी समूहावर एकंदर ४६,००० कोटी रुपयांचा कर्ज भार आहे.