फ्यूचर समूहाचे मुख्याधिकारी किशोर बियाणी यांना रोखे बाजारात व्यवहार करण्यास नियामक यंत्रणा सेबीने वर्षभरासाठी बंदी घातली आहे. भांडवली बाजाराशी संबंधित व्यवहार करण्यास बियाणी यांचे बंधू अनिल बियाणी यांनाही मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, रिलायन्सबरोबरच्या व्यवहाराबाबत देण्यात आलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ निर्णयाला आव्हान देण्याचे पाऊल फ्यूचर रिटेल कंपनीने उचलले आहे. न्यायालयाच्या मंगळवारच्या निर्णयाबद्दल कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जातील, असे कंपनीने स्पष्ट केले होते.

वर्ष २०१७च्या मार्च आणि एप्रिलमध्ये केलेले कंपन्यांच्या समभागाचे व्यवहार संशयास्पद असल्याचा ठपका ठेवत सेबीने फ्यूचर समूहातील फ्यूचर रिटेलच्या समभागांची खरेदी तसेच विक्री करण्यासही दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

याबाबतच्या तपासानंतरही कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे सेबीने स्पष्ट केले. समूहातील फ्यूचर कॉर्पोरेट रिसोर्सेस लिमिटेड एम्प्लॉई वेलफेअर ट्रस्टवरही निर्बंध आणताना बियाणी बंधूंना दंड ठोठावण्यात आला आहे. यानुसार बियाणी बंधूना येत्या ४५ दिवसात प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड भरणे आवश्यक करण्यात आले आहे.