शहरातील मच्छीमार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मच्छीमार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची २३वी वार्षिक सभा अलीकडेच माहीम येथे संपन्न झाली. पतसंस्थेने लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवून आगामी रौप्यमहोत्सवी वर्ष जोमदारपणे साजरे करण्यासाठी उत्तम सुसज्जता केली आहे, असे उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणांत हिराजी तांडेल यांनी काढले. सातारा सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक विजयकुमार बागवे यांनी सभेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक पंढरीनाथ तामोरे यांनी प्रास्ताविक केले. कमी व्याजदराच्या ठेवी वाढविणे, कर्जपुरवठा वाढवून, त्याच्या नियमित वसुलीसह थकीत कर्जाचे प्रमाण किमान राखणे असे आगामी काळासाठी कार्यसूत्र संस्थेचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र मेहेर यांनी अहवाल वाचन करताना सांगितले.