अमेरिकन कंपनी Apple आपल्या मोबाईल फोनमधील ग्राहकांच्या डेटा सुरक्षेसाठी प्रामुख्यानं ओळखली जाते. असं असलं तरी नवे आयफोन बाजारात आल्यानंतर जुन्या आयफोनचा वेग कमी झाल्याच्या अनेक तक्रारी मध्यंतरी समोर आल्या होत्या. Batterygate हे यापैकीच एक आहे.

दरम्यान, #batterygate या प्रकरणी सेटलमेंट म्हणून ११३ दशलक्ष डॉलर्सची रक्कम दंड म्हणून भरणार असल्याची घोषणा Apple कडून करण्यात आली आहे. अमेरिकेतील तब्बल ३४ राज्य एकत्रित याप्रकरणी तपास करत होती. यापूर्वीही कंपनीनं या प्रकरणी ५०० दशलक्ष डॉलर्सचा दंड भरला होता. ग्राहकांचे फोन स्लो करणं हे कंपनीला भलतंच महागात पडलं असून त्यांना एकून ६१३ दशलक्ष डॉलर्सचा म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये तब्बल ४५.५४ अब्ज रूपयांचा दंड भरावा लागला आहे.

काय आहे batterygate प्रकरण?

Apple नं २०१७ मध्ये एक आयफोनसाठी एक नवं अपडेट दिलं होतं. यानंतर जुने आयफोन स्लो झाले होते. अशा अनेक तक्रारीही समोर आल्या होत्या. कंपनीनं अपडेट देण्यापूर्वी ग्राहकांना याबाबत माहिती दिली नव्हती. कंपनीनं अपडेट देत आयफोन स्लो केला होता. ग्राहकांच्या तक्रारी समोर आल्यानंतर कंपनीकडून आयफोन स्लो करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जुन्या बॅटरीमुळे आयफोन आपोआप शटडाऊन होऊ नये अथवा त्यात आणखी कोणत्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी फोन स्लो केल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.

परंतु यानंतर अमेरिकेती ३४ राज्यांनी Apple विरोधात तपास सुरू केला आणि न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. कंपनी महागडे आयफोन खरेदी करण्यासाठी असं करत असल्याचा ठपका राज्यांनी ठेवला.

“मोठ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना उत्पादनांबाबत खरी माहिती द्यायला हवी,” असं मत अॅरिझोनाचे अॅटर्नी जनरल मार्क बर्नोविक यांनी सांगितलं. “मोठ्या कंपन्या आपल्या ग्राहकांपासून माहिती लपवत असतात. अशा कंपन्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यास मी कटिबद्ध आहे,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, कंपनीनं दंड भरण्यास होकार दिला असला तरी आपल्याकडून चूक झाली हे मान्य करण्यास मात्र नकार दिला आहे. केवळ बॅटरी चांगली राहावी आणि फोनमध्ये कोणतीही दुसरी समस्या निर्माण होऊ नये म्हणून आयफोन स्लो केल्याचं कंपनीनं म्हटलं.