अमेरिकेच्या दौऱ्यातच व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा येण्याची जेटलींना भीती

अमेरिकेने व्हिसाच्या शुल्कात केलेल्या वाढीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. ही शुल्कवाढ सापत्नभावाची असून त्याचा फटका मोठय़ा प्रमाणावर भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) व्यावसायिकांना बसणार आहे, असे भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी दूत मायकेल फ्रॉमन यांच्याशी चर्चा करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतच्या संबंधित करारावर लवकर तोडगा काढण्याची गरज अधोरेखित केली. त्याचा फायदा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना होणार आहे.

एच-१बी आणि एल १ व्हिसा शुल्कवाढीच्या प्रश्नावर जेटली यांनी चिंता व्यक्त केली, ही शुल्कवाढ सापत्नभावाची आहे आणि त्याचा फटका मुख्यत्वे आणि मोठय़ा प्रमाणावर भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना बसणार आहे, असे जेटली म्हणाले.

गेल्या वर्षी अमेरिकेतील काँग्रेसने एच-१बी आणि एल १ व्हिसावर ४५०० डॉलरची विशेष शुल्कवाढ केली, सदर व्हिसा भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये लोकप्रिय आहे. ९/११ आरोग्यविषयक कायदा आणि बायोमेट्रिक ट्रेकिंग यंत्रणेसाठी हे शुल्क वाढविण्यात आले.

अमेरिकेचा खर्च भागविण्यासाठी काँग्रेसने एच-१बी व्हिसातील विविध वर्गवारीवर चार हजार डॉलर आणि एल-१ व्हिसावर ४५०० डॉलर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.

गेल्या दशकांत भारतीय व्यावसायिकांनी अमेरिकेच्या सामाजिक सुरक्षा क्षेत्रात २५ अब्ज डॉलरहून अधिक योगदान दिले, दुहेरी कर टाळण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांशी सामाजिक सुरक्षा करविषयक विशिष्ट करार केले आहेत.

दुसऱ्या देशात कामासाठी गेले असताना थोडय़ा कालावधीसाठी व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा करात सवलत देण्यात येते.