फेब्रुवारीमधील देशांतर्गत प्रवासी विक्रीत लक्षणीय वाढ

निश्चलनीकरणाच्या संकटातून देशातील प्रवासी वाहन उत्पादक कंपन्यांनीही आपली सुटका करून घेतल्याचे फेब्रुवारीमधील वाहनविक्रीच्या वाढत्या आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी यंदा वाहन विक्रीतील लक्षणीय वाढ नोंदविली आहे.

मारुती सुझुकीसह फोर्ड, होंडा या कंपन्यांनीही फेब्रुवारीमध्ये वाढीव विक्री नोंदविली आहे. त्याचबरोबर यापूर्वी विक्रीत घसरण राखणाऱ्या टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्करलाही यंदा यश मिळाले आहे.

मारुती सुझुकीने ११.७० टक्के वाढ नोंदविताना गेल्या महिन्यात १,२०,७३५ वाहनांची विक्री केली आहे. कंपनीची सर्व वाहने प्रवासी गटातील आहेत. कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहनांच्या जोरावर कंपनीला हे यश मिळाले आहे. तर कंपनीच्या अल्टो, व्हॅगनआर वाहनांमध्ये यंदा घसरण झाली आहे. तर प्रमुख स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर इंडियाची विक्री अवघ्या ४ टक्क्यांनी सुधारून ४२,३२७ झाली आहे.

फोर्ड इंडियाच्या वाहन विक्रीत फेब्रुवारीमध्ये तब्बल ५२ टक्के वाढ नोंदली गेली आहे. इकोस्पोर्ट, एन्डेव्हरसारख्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीची गेल्या महिन्यातील वाहन विक्री वर्षभरापूर्वीच्या ५,४८३ वरून थेट ८,३३८ वर गेली आहे.

टोयोटा किर्लोस्करने ११.९३ टक्के वाढ नोंदविताना ११,५४३ वाहने यंदा विकली आहेत. तर टाटा मोटर्सची देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री १२ टक्क्यांनी उंचावत १२,२७२ झाली आहे. रेनो इंडियाच्या विक्रीत २६.८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने यंदा ११,१९८ वाहने विकली. होंडाची वाहन विक्री यंदा ९.४४ टक्क्यांनी वाढून १४,२४९ वर गेली आहे. निस्सान मोटर इंडियाने २४.८६ टक्के विक्री राखत फेब्रुवारीमध्ये ४,८०७ वाहने विकली आहेत.

एसयूव्ही गटातील अव्वल महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रला मात्र २.२६ टक्के विक्री घसरणीला यंदा सामोरे जावे लागले आहे. फेब्रुवारी २०१६ मधील ४१,३४८ वाहन विक्रीच्या तुलनेत कंपनीला यंदाच्या फेब्रुवारीला ४०,४१४ वाहनेच विकता आली आहेत.

महिंद्र समूहाच्या महिंद्र ट्रॅक्टरची एकूण विक्री मात्र १०.५५ टक्क्यांनी वाढून १५,००७ पर्यंत गेली आहे. कंपनीच्या या गटातील निर्यातीत तब्बल ३५ टक्के वाढ झाली आहे. व्यापारी वाहनांसाठीच्या गटातील एसएमएल इसुझुने १३.३६ टक्के वाढीसह फेब्रुवारी २०१७ मध्ये १,१४५ वाहने विकली आहेत. याच गटातील अशोक लेलँडची विक्री अवघ्या ५ टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारीत ती १४,०६७ झाली आहे.

दुचाकी वाहन निर्मात्यांमध्ये आयशर मोटर्सच्या रॉयल एनफिल्डची विक्री १८.८८ टक्क्यांनी वाढून ५८,४३९ वर गेली आहे. तर तीन चाकी वाहन उत्पादक कंपनी अतुल ऑटोने यंदा १८.४६ टक्के विक्रीतील घसरण नोंदविली आहे.

निश्चलनीकरण कालावधीत, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादन ७.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याची अर्थसकारात्मक आकडेवारी मंगळवारीच स्पष्ट झाली होती. त्यापाठोपाठ देशातील वाहन उद्योगाची फेब्रुवारीतील वाढीव कामगिरीही आता समोर आली आहे.