News Flash

बजाज ऑटोमधील तिढा कायम

बजाज ऑटो व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात चाकण येथील प्रकल्पावरून सुरू असलेला तिढा मिटण्याची चिन्हे नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ‘विनाशर्त काम सुरू केल्याशिवाय चर्चा नाही

| July 2, 2013 12:03 pm

बजाज ऑटो व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात चाकण येथील प्रकल्पावरून सुरू असलेला तिढा मिटण्याची चिन्हे नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ‘विनाशर्त काम सुरू केल्याशिवाय चर्चा नाही व कंपनी दबावाला बळी पडणार नाही,’ असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तर, कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी दिला आहे.
कामगारांना शेअर मिळावेत,  नवीन करारावर बोलणी करावी आदी मागण्यांसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने २५ जूनपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. चाकण येथे सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आकुर्डीत उमटले असून आता व्यवस्थापन व संघटना अशा दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दरम्यान, पुणे परिसरातील कामगार आंदोलन आता आयटीसीच्या रांजणगाव प्रकल्पातही पोहोचले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शनिवारपासून आंदोलन सुरू केले आहे.
विनाशर्त कामाशिवाय चर्चा नाही – व्यवस्थापन
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप श्रीवास्तव, उपाध्यक्ष कैलाश झांजरी, अमृत रथ यांनी सोमवारी कंपनीची भूमिका पत्रकार परिषेदत मांडली. त्यांनी संघटनेचे सर्व आरोप फेटाळले व कामगारांना शेअर देण्याची मागणीही धुडकावून लावली. ‘‘कामगारांचा संप बेकायदा असून दिलीप पवार त्याला कारणीभूत आहेत. कामगारांना दमदाटी व धमक्या दिल्या जात असून १५ तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. कंपनीचे उत्पादन जाणीवपूर्वक घटविले जात आहे. पवार यांना पंतनगर येथील प्रकल्पामध्ये प्रवेश हवा होता. तो मिळाला नाही म्हणून ते सूडबुद्धीने वागत आहेत. कंपनीकडून चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. याबाबत संघटनेकडून होणाऱ्या तक्रारी चुकीच्या आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, तोडगा निघत नाही. कामगारांनी विनाशर्त कामावर यावे,’’ असे आवाहन करतानाच आम्ही दबावाला बळी पडणार नसल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
आंदोलन अधिक उग्र करणार : संघटना
संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पत्रकारांना सांगितले, आपण कामगारांना भडकावले नाही. मी पंतनगरला गेल्याचा व्यवस्थापनाला राग आहे. कामगारांवर कारवाई थांबवावी, यापूर्वीची कारवाई मागे घ्यावी. कामगारांसाठी शेअर द्यावेत, तो त्यांचा अधिकार आहे. ते का देता येत नाहीत, यावर चर्चा करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. कंपनीकडून कामगारांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण केले जाते. उत्पादन आम्ही कमी केले नसून ते मंदीच्या काळात कमी झाले. न्याय्य हक्क मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 12:03 pm

Web Title: bajaj autos chakan plant workers to continue strike after talk fail
टॅग : Business News,Strike
Next Stories
1 महिंद्रची वाहने महागली
2 हीरोच्या बाईक ३० हजाराच्या आत?
3 टोनी-टाटांचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज
Just Now!
X