बँकांकडून ऋण दरात (बेस रेट) झालेली ताजी कपात आणि ढासळलेल्या पत गुणवत्तेचे जुने दुखणे पाहता, नजीकच्या काळात बँकांच्या नफाक्षमतेत सुधाराची शक्यता धूसरच असल्याचा निष्कर्ष ‘बीएमआय रिसर्च’च्या अभ्यास अहवालाने नोंदविला आहे.

‘बीएमआय रिसर्च’ ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच’च्या समूहातील संशोधन संस्था आहे. तिने भारताच्या बँकिंग उद्योगापुढील अनेक मोठी आव्हाने कायम असून, त्यांची तीव्रता कमी होत असल्याचेही  दिसत नसल्याचे म्हटले आहे. बँकांकडून व्याज दरात कपात झाल्याने त्यांच्या व्याजापोटी उत्पन्नावर गदा येईल व नफ्याच्या दृष्टीनेही नकारात्मक बाब ठरेल, असे हा अहवाल म्हणतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुढे तर मोठी बुडीत कर्जे आणि भांडवलाच्या चणचणीचेही आव्हान आहे. त्या उलट खासगी बँकांची स्थिती उत्तम व्यवस्थापन, सशक्त भांडवली पाया यामुळे तुलनेने चांगली असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.