सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत १३०.४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गतवर्षी सप्टेंबरअखेर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ११५.०५ कोटी होता, त्यात यंदाची वाढ ही १३.४ टक्क्यांची आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बँकेने पतगुणवत्तेत लक्षणीय सुधार केला असून, सप्टेंबर २०१९ अखेर १६.८६ टक्के पातळीवर असलेली एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण यंदाच्या सप्टेंबर तिमाहीअखेर निम्म्यावर म्हणजे ८.८१ टक्क्यांवर आले आहे. ‘बुडीत कर्जाचे प्रमाण चिंताजनक दोन अंकी स्तरावर राहण्याचे दिवस मागे सरले आणि यापुढील काळात ही मात्रा उत्तरोत्तर कमी होत जाईल,’ असा विश्वास सोमवारी तिमाही कामगिरी पत्रकारांपुढे सादर करताना, महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ए. राजीव यांनी व्यक्त केला.

विशेषत: बँकेचे चालू वर्षांत सप्टेंबरअखेपर्यंत एकूण कर्ज वितरणात २१.३१ टक्क्यांची, तर किरकोळ कर्ज वितरणात ३४.४२ टक्क्यांची वाढ केली आहे. ही सर्व कर्जे आवश्यक ते सर्व दक्षता आणि पूर्वकाळजी घेऊन वितरित केली गेली असून, ती थकत जाण्याची शक्यता संभवत नाही, असे राजीव म्हणाले.

बुडीत कर्जे घटली असतानाही, बँकेने दुसऱ्या तिमाहीत, कर्ज थकितासाठी आणि आकस्मिक स्थितीसाठी तरतूद गतवर्षांतील २९३.७० कोटींवरून यंदा ४२०.९२ कोटी रुपयांपर्यंत वाढविली आहे. सरलेल्या तिमाही कालावधीत कोविड आजारसाथीशी संबंधित ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही महाबँकेने केली आहे. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीसाठी एकूण तरतूद ९२५ कोटींवर जाणारी असल्याचे राजीव यांनी स्पष्ट केले.

बँकेचे एकूण उत्पन्न वार्षिक तुलनेत ६.९८ टक्क्य़ांनी वाढून १,५७२ कोटी रुपयांवर गेले. व्याजापोठी निव्वळ उत्पन्नातही ४.३८ टक्के अशी वाढ होऊन ते तिमाहीत १,१२० कोटी रुपये नोंदविले गेले.

वित्तीय कामगिरीत कायापालट सूचित करणाऱ्या या तिमाही निकालांना भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनीही स्वागत केले. महाबँकेचा समभाग सोमवारच्या व्यवहारात ६.९२ टक्क्यांच्या उसळीसह ११.९० रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला होता.