व्याजेत्तर उत्पन्नात वाढ आणि बुडीत कर्जाबाबत जोखीम तरतुदीत झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) जुलै-सप्टेंबर २०१४ तिमाहीत १६२.९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीअखेर असलेल्या नफ्याच्या तुलनेत यंदाची वाढ ही तब्बल २४७.७३ टक्केम्हणजे जवळपास अडीच पट आहे.
पुण्यात मुख्यालय असलेल्या या बँकेने एकूण अर्थव्यवस्थेची स्थिती बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने खडतर असताना, नफाक्षमतेच्या सर्व निकषांवर उठून दिसेल, अशी कामगिरी केली आहे. महाबँकेचे एकूण उत्पन्न तिमाहीत ३,४१९.५६ कोटी रुपयांवर गेले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत ३,१९६.५८ कोटी होते. बँकेकडून वितरित एकूण कर्जाच्या तुलनेत बुडीत कर्जाचे प्रमाण (ग्रोस एनपीए) सप्टेंबर २०१३ मधील २.७७ टक्क्यांवरून, यंदा सप्टेंबरअखेर ४.८३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नक्त एनपीएचे प्रमाणही १.७६ टक्क्यांवरून ३.२९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
कर्ज मालमत्तेची गुणवत्ता ढासळण्याला सध्याचे आर्थिक वातावरण जबाबदार असल्याचे महाबँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत यांनी सांगितले. तथापि या बुडीत कर्जाच्या तुलनेत बँकेला ताळेबंदात करावी लागणारी जोखीम तरतूद वर्षभरापूर्वीच्या ३२३.२३ कोटींवरून यंदा २९३.४१ कोटींवर घसरली, असा सकारात्मक बदल घडला असल्याचे मुनोत यांनी सांगितले. थकित कर्जाची वसुलीही ३११ कोटींच्या घरात झाली आहे.
‘पुढचा टप्पा गतिमान विस्तार व वृद्धीचा’
गेले वर्षभर बँकेने नफाक्षमतेला इजा न पोहचविता जाणीवपूर्वक व्यवसायाच्या सुदृढीकरणाचे धोरण अंगीकारले. परिणामी एकूण व्यवसाय वाढला नसला तरी, व्यवसायाच्या अनेकांगात गुणात्मक सुधार घडला आहे. जो पुढील वेगवान वृद्धी-विस्तारास मदतकारक ठरेल. बँकेने चालू अर्धवार्षिकात कृषी कर्जात २५ टक्क्यांची, गृहकर्जात २८ टक्क्यांसह, एकूण किरकोळ कर्जात २० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली आहे. यापुढे चांगला परतावा देणारी कृषीपूरक गुंतवणूक क्षेत्र, लघू व मध्यम उद्योग आणि बडय़ा उद्योगांसाठी कर्ज वितरण आक्रमकपणे वाढविले जाईल. सध्या या क्षेत्राला कर्जवितरणात २ टक्के दिसणारी वाढ १२ टक्क्यांवर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.