रेपो दर कपातीला अनुसरून पाऊल पडण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाला विश्वास
भारताची वाटचाल अल्पतम व्याजदराच्या पर्वाच्या दिशेने सुरू असल्याचे अधोरेखित करीत केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी, रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या रेपो दर कपातीला अनुसरून बँकांकडून व्याजाचे दर पुढील काही दिवसांत खाली आणले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतीच रेपो दरात पाव टक्का कपात केली आहे. सरकारने वित्तीय तुटीचे प्रमाण हे ३.५ टक्क्य़ांच्या मर्यादेत राहील आणि अल्पबचत योजनांच्या ठेवदराचीही फेररचना केली आहे. हा रिझव्‍‌र्ह बँकेला सकारात्मक संकेत होता. रिझव्‍‌र्ह बँकेनेही व्याजदर कमी करून त्याला प्रतिसाद दिला. आता वाणिज्य बँकांकडून ग्राहकांसाठी कर्ज स्वस्ताईचे पाऊल पडण्याची अपेक्षा आहे. अर्थात बँका स्वायत्तपणेच निर्णय घेतील, अशी पुस्तीही दास यांनी जोडली; पण पुढील काही दिवसांत अथवा आठवडय़ाभरात हे घडेल, असे ते म्हणाले.
महागाई दरावर समाधानकारक नियंत्रण मिळविले असल्याने भारताची वाटचाल कमी व्याजदराच्या पर्वाकडे सुरू झाली असल्याचे दास यांनी सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही वित्तीय तुटीला ३.५ टक्क्य़ांच्या मर्यादेत राखण्याचे अवघड आव्हान पेलून, अर्थव्यवस्थेत व्याजाचे दर वाढणार नाहीत याचे सशक्य संकेत दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग अग्रणी स्टेट बँक तसेच खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा आयसीआयसीआय बँकेने शुक्रवारच्या पाडव्याच्या निमित्ताने गृह कर्ज स्वस्ताईची गुढी उभारली. अर्थात गृह तसेच वाहनांसाठीच्या कर्जावरील व्याजदरात केली गेलेली किरकोळ कपात ही ऋणदर निर्धारणाच्या नव्या एमसीएलआर पद्धतीतून झाली आहे. रेपो दर कपातीच्या परिणामी नजीकच्या काळात व्याजदर कपात शक्य असल्याचे स्टेट बँकेनेही स्पष्ट केले आहे. स्टेट बँक तसेच आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज स्वस्ताईचे पहिले पाऊल पडल्यास अन्य बँकांकडून त्याचे अनुकरण करणारा ताबडतोब प्रतिसाद मिळत असतो.