किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाची वसुली बँकांनी समभाग विकून काही प्रमाणात केली असली तरी उर्वरित वसुलीसाठी आता प्रवर्तक विजय मल्ल्या यांची मालमत्ता विकण्याच्या तयारीत बँका आहेत. मल्ल्या यांचे कार्यालय तसेच घराच्या विक्रीची चाचपणी करण्यासाठी स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली अन्य बँकांही येत्या आठवडय़ात एक बैठक घेणार आहेत.
एवढेच नव्हे तर कंपनीच्या अखत्यारितील विमाने, हेलिकॉप्टर तसेच बस आदी वाहनांच्या विक्रीबाबतची नोटीसही बजाविण्याची दाट शक्यता आहे. किंगफिशर एअरलाईन्सला विविध बँकांनी ७,००० कोटी रुपयांहून अधिक कर्जे दिले आहे. तुलनेत कंपनीचे समभाग, ब्रॅण्ड, मल्ल्या यांचे गोव्यातील निवासस्थान तसेच मुंबई उपनगरातील कार्यालयाची जागा यांची किंमत ६,००० कोटी रुपयांहूनही अधिक आहे. ब्रिटनच्या डिआजिओमार्फत मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरिटमधील वाढीव हिस्सा खरेदी प्रक्रिया लांबणीवर पडल्यानंतर अनेक बँकांनी किंगफिशरचे समभाग खुल्या बाजारात विकून ५०० कोटी रुपये उभे केले होते. यामध्ये आघाडीची राष्ट्रीयकृत स्टेट बँकही होती व त्याची कंल्पना मुंबई उच्च न्यायालयालाही देण्यात आली होती.
स्टेट बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक श्यामला आचार्य यांनी एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत बँकांमार्फत अशी तयारी सुरू असल्याचे नमूद करतानाच नेमकी तारिख मात्र स्पष्ट केलेली नाही. किंगफिशरला बँकांनी दिलेल्या एकूण कर्जामध्ये स्टेट बँकेचा सर्वाधिक, २५ टक्के (१,७०० कोटी रुपये) हिस्सा आहे. २००५ मध्ये भारतीय हवाई सेवा क्षेत्रात व्यवसाय सुरू करणाऱ्या किंगफिशरची उड्डाणे ऑक्टोबर २०१२ पासून ठप्प आहेत.