मुंबई : बीएनपी परिबा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ‘बीएनपी परिबा इंडिया कंझम्प्शन फंड ही मुदत मुक्त समभागसंलग्न (इक्विटी) योजना शुक्रवारपासून गुंतवणुकीस खुली केली. वाढत्या क्रयशक्तीसह ग्राहकांच्या उत्पादने आणि सेवा यांच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांना फायदा होणे अपेक्षित आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवलवृद्धी करणे आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी उपलब्ध करण्याचा फंडाचा उद्देश आहे. फंडातील प्रारंभिक गुंतवणूक ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील.

या फंडाच्या माध्यमातून वाहन, बँका, सिमेंट, बांधकाम, घरगुती गॅस वितरण, आरोग्यसेवा, हॉटेल्स, माध्यमे आणि करमणूक, कीटकनाशके, औषधे, किरकोळ विक्री, वस्त्रोद्योग उत्पादने आणि संबंधित मूल्य शृंखलेतील व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल, असे बीएनपी परिबा फंड घराण्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी शरद शर्मा यांनी सांगितले.

मागील दशकाच्या तुलनेत सध्या व्यक्तिगत उपभोग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. उपभोगाच्या या बदलत्या स्वरूपाचा या क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कंपन्यांनाही  फायदा होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

बीएनपी परिबा अ‍ॅसेट मॅनेजमेंटचा हा पंधरावा फंड आहे. बीएनपी परिबा इंडिया कंझम्प्शन फंड वितरण तारखेपासून कारभार होणाऱ्या पाच दिवसात नियमित खरेदी-विक्रीसाठी पुन्हा खुला होईल.