समाप्तीला महिन्याचा अवधी असलेल्या चालू वित्त वर्षांत जानेवारी २०२१ पर्यंत कंपन्यांनी भांडवली तसेच रोखे बाजारातून ८.४० लाख कोटी रुपये उभे केले असून गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ही रक्कम ४०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.

चालू आर्थिक वर्षांत जानेवारीपर्यंत १८ कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया झाली. जवळपास प्रत्येक भागविक्रीला गुंतवणूकदारांचा दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे. तर १८ पैकी सहा कंपन्यांच्या भागविक्रीला १०० पटींहून अधिक नोंदणी झाली आहे. या सहापैकी पाच कंपन्यांच्या प्रक्रियेला गुंतवणूकदारांचा थेट १५० पट प्रतिसाद मिळाला आहे. प्रक्रियेतील अधिकतर कंपन्यांचे मूल्य वरच्या स्तराला नोंदणीकृत झाले.

शेवटच्या महिन्यात १६ ‘आयपीओ’

टाळेबंदीच्या घोषणेमुळे वर्षांच्या तळाला गेलेला प्रमुख निर्देशांकांचा स्तर वित्त वर्ष समाप्तीपूर्वीच दुपटीहून अधिक झाला असून चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात १६ कंपन्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीसाठी रांगेत आहेत. येत्या महिन्यात समभाग विक्रीकरिता बाजारात उतरणाऱ्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी, नजारा टेक्नॉलॉजीज, आधार हाऊसिंग फायनान्स, कल्याण ज्वेलर्ससारख्या कंपन्यांच्या माध्यमातून २५,००० कोटी रुपये उभे राहण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षांतील प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेत सहभागी झालेल्यांमध्ये वैश्विक आजारसाथ कोविड-१९ तसेच टाळेबंदीचा फटका बसलेल्या क्षेत्रातील कंपन्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा कंपन्या आता आर्थिकदृष्टय़ा सावरत असल्याचेही दिसत आहे. – अजय त्यागी, अध्यक्ष, सेबी.