बँकांच्या वसुलीला स्थगितीची मागणी ब्रिटिश न्यायालयाने धुडकावली

लंडन : कर्जवसुलीकरिता लंडनमधील खात्यांतील रक्कम मिळविण्याचा बँकांचा प्रयत्न थोपविण्याची विजय मल्या याची मागणी ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी धुडकावून लावली आहे.

किंगफिशरचा प्रवर्तक मल्या याचे लंडनमधील आयसीआयसीआय बँकेत खाते असून त्यात २.६० लाख पौड इतकी रक्कम आहे. भारतात विविध १८ बँकांकडून घेतलेल्या ९,००० कोटी रुपयांच्या कर्जवसुलीकरिता मल्या याच्या लंडनमधील या खात्यातील रकमेबाबत तपास यंत्रणा आग्रही आहेत. मात्र येथील न्यायालयात सुनावणीदरम्यान मल्या याने बँकांच्या कार्यवाहीला आक्षेप घेत, ती थांबविण्याची मागणी न्यायाधीश मास्टर डेव्हिड कूक यांच्याकडे केली. न्यायालयाने मात्र मल्या याची ही मागणी मान्य केली नाही. परिणामी मल्या याचे ब्रिटनमधील हे बँक खाते तूर्त गोठवलेल्या स्थितीचच राहणार आहे.

ब्रिटनच्या न्यायालयाने जामीन दिल्याने मल्या सध्या ब्रिटनमध्येच मात्र तुरुंगाबाहेर आहे. कर्ज बुडविल्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांचे मल्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्नही  सुरू आहेत.

मल्याकडून ‘सांत्वना’संदेश

जेट एअरवेजवरील संकटाबद्दल केंद्र सरकारला दोष देताना किंगफिशरच्या विजय मल्या याने, देशातील एवढी मोठी कंपनी अस्तंगत होत असल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाला ३५,००० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देणाऱ्या सरकारची ‘जेट’बद्दलची भूमिका दुटप्पी असल्याचे मल्या याने प्रतिक्रियेच्या रूपात ट्वीट केले आहे. आपण लंडन अथवा मुंबईच्या तुरुंगात असलो तरी बँकांचा प्रत्येक रुपया चुकवू; मात्र बँकांनी माझी सुरुवातीची रक्कम स्वीकारण्याचा प्रस्ताव स्वीकारावा, असे आवाहनही मल्या याने या निमित्ताने केले.