प्रमुख निर्देशांकांची पाच महिन्यांतील सर्वोत्तम सत्रझेप; मुंबई ३८,७०० तर राष्ट्रीय निर्देशांक ११,७०० नजीक

जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील प्रमुख निर्देशांकांना सोमवारी त्याच्या गेल्या पाच महिन्यातील सर्वात मोठी सत्रझेप नोंदविता आली. यामुळे सेन्सेक्स ३८,७०० तर निफ्टी ११,७०० नजीक पोहोचला.

आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारअखेर ४४२.३१ अंश वाढीसह सेन्सेक्स ३८,६९४.११ वर तर १३४.८५ अंश भर टाकत ११,६९१.९५ पर्यंत झेपावला. दोन्ही निर्देशांक अखेर शुक्रवारच्या तुलनेत एक टक्क्य़ाहून अधिक उंचावले.

गेल्या सप्ताहाची अखेर करण्यापूर्वीच्या सलग चार व्यवहारात सेन्सेक्स तसेच निफ्टीने सत्रागणिक नव्या विक्रमाची नोंद केली होती. शुक्रवारी मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांक काही प्रमाणात खाली आले होते.

अमेरिकी अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याने फेडरल रिझव्‍‌र्हने आपले आगामी पतधोरण कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात आशियाई तसेच युरोपीय भांडवली बाजारांची सुरुवात तेजीसह झाली.

परिणामी येथील मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांकही सोमवार सकाळच्या व्यवहारातच नव्या विक्रमावर स्वार झाले. सेन्सेक्सने सत्रात ३८,७०० पुढील, ३८,७३६.८८ हा सर्वोच्च टप्पा अनुभवला. तर निफ्टी व्यवहारात ११,७०० च्या काठावर, ११,७००.९५ वर पोहोचला होता. दोन्ही निर्देशांकांनी यापूर्वी, २३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च टप्पा गाठला होता.

मुंबई निर्देशांकाने यापूर्वी ५ एप्रिल २०१८ रोजी व्यवहारातील सर्वाधिक, ५७७.७३ अंश वाढ नोंदविली होती. तर निफ्टी या दरम्यान १९६.७५ अंशांनी एकाच सत्रात वाढला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार युद्धाचे सावट तूर्त काहीसे सावरले आहे. अमेरिकी डॉलर भक्कम होणे तसेच खनिज तेलाच्या किंमतीत वाढ होणे याचा फारसा विपरित परिणाम येथील प्रमुख निर्देशांकांवर झाला नाही.

बँकांची कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांचा तिढा राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापुढे सुटण्याच्या आशेने प्रामुख्याने बँक तसेच ऊर्जा, स्टील, सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. ऊर्जा निर्देशांक सर्वाधिक, २.३७ टक्क्य़ांसह वाढला.

स्थावर मालमत्ता वगळता इतर सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक सोमवारी मुंबई शेअर बाजारात तेजीच्या यादीत राहिले. तर सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, पॉवर ग्रिड हे जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंतच्या वाढीसह मुंबई निर्देशांकात अव्वल राहिले. सन फार्मा सव्वा टक्क्य़ाच्या घसरणीसह सेन्सेक्समध्ये राहिला.

आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, येस बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक तसेच विप्रो, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एनटीपीसी, रिलायन्स, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, कोल इंडिया, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, वेदांता, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे मूल्य वाढले.

सोने-चांदी दरांमध्ये चकाकी

ओणमबरोबरच सण-समारंभाचे वेध लक्षात घेत मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये उसळी अनुभवणे आता सुरू झाले आहे. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी एकाच व्यवहारात तब्बल ३५५ रुपयांनी उंचावत ३० हजारानजीक, २९,८८५ रुपयांवर पोहोचले. तर चांदीचा किलोचा दर सत्रात थेट ३९० रुपयांनी वाढून ३७,१०५ रुपयांवर गेला.

रुपयात पुन्हा घसरण

येथील परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण नवसप्ताहारंभीच पुन्हा ७० च्या खाली गेली. शुक्रवारच्या तुलनेत स्थानिक चलन थेट २५ पैशांनी रोडावत ७०.१६ पर्यंत घसरले. दरम्यान, खनिज तेलातील दरचढाई सोमवारीही कायम राहिली. काळ्या सोन्याचे दर प्रति पिंप ७६ नजीक पोहोचले.