सलग सात दिवस सुरू राहिलेल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांच्या दौडीने गुरुवारी काहीशी उसंत घेतली, तर शुक्रवारी जागतिक बाजारातील नकारात्मकतेच्या परिणामी तिला मोठे भगदाड पडले. अमेरिकी अर्थसत्तेवर पुन्हा एकदा घोंघावत ‘शटडाऊन’च्या  संकटाने जगभरातील सर्वच प्रमुख बाजारांमध्ये थरकाप निर्माण केला.

मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारच्या पडझडीत ६८९.६० अंशांनी गडगडला. १.८९ टक्क्य़ांच्या या घसरणीने सेन्सेक्स दिवसअखेर ३५,७४२.०७ अंशांवर स्थिरावलेला दिसला. गुरुवारच्या व्यवहारातही त्यात ५३ अंशांची माफक घसरण दिसली होती. मात्र त्याआधी व्यवहार झालेल्या सलग सात दिवसांमध्ये या निर्देशांकाने १,५०० हून अधिक अंशांची म्हणजे चार टक्क्य़ांची झेप घेतली आहे.

बरोबरीने निफ्टी निर्देशांकातही शुक्रवारच्या व्यवहारात १९७.७० अंशांनी (१.८१ टक्के) गडगडला आहे. परिणामी निर्देशांकाने तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची १०,८०० ची पातळीही तोडली आणि दिवसअखेर तो १०,७५४ अंशांवर स्थिरावला. बाजारात सर्वव्यापी विक्रीने जोर पकडलेला दिसला. त्यामुळे गुरुवारच्या मुख्य निर्देशांकांच्या घसरणीतही वाढ दाखविणाऱ्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांचीही दीड ते सव्वा टक्के फरकाने शुक्रवारच्या व्यवहारात घसरगुंडी दिसून आली.

प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठे भारमान असणाऱ्या रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड, आयटीसी, मारुती, एल अ‍ॅण्ड टी, हिंदुस्तान युनिलिव्हर, अ‍ॅक्सिस बँक, विप्रो आणि इंडसइंड बँक या समभागांमध्ये तब्बल ४ टक्क्य़ांपर्यंत शुक्रवारी घसरण राहिली. गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लवकरच बँकांना आणखी ८३,००० कोटी रुपयांचे भांडवली स्फुरण देण्याचे केलेले सूतोवाच, सरकारी बँकांच्या समभागांसाठी फारसे फायदेशीर ठरल्याचे दिसून आले नाही.

गुंतवणूकदारांच्या भीतीचे कारण?

सलगपणे सुरू राहिलेल्या तेजीच्या दौडीनंतर, नफा कमावण्यासाठी विक्री होऊन बाजार गडगडणे अपेक्षितच असले, तरी बाह्य़ कारणाने या पडझडीची व्याप्ती आणखी वाढविली. अमेरिकी प्रशासन आणि अर्थव्यवस्था ठप्प पडण्याचे ग्रहण, बरोबरीने जागतिक अर्थवृद्धी दर रोडावण्याचे व्यक्त झालेल्या अंदाजांनी गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पाडली. परिणामी गुरुवारच्या व्यवहारात अमेरिकी बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स दोन टक्क्य़ांनी गडगडला. एस अ‍ॅण्ड पी ५०० आणि नॅसडॅक निर्देशांकातही पावणेदोन टक्क्य़ांची घसरणीने पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांनी घसरणीनेच सुरुवात केली. रुपयाच्या विनिमय मूल्यात डॉलरच्या तुलनेत मोठय़ा घसरणीने मुख्यत: निर्यातप्रवण माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांच्या मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीचेही प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीत मोठा वाटा राहिला.

‘जागतिक बाजारांच्या तुलनेत भारताला अस्थिरतेच्या झळा कमी’

कोलकाता : चालू वर्षांत जगभरातील सर्वच बाजार आणि गुंतवणूकदारांना अस्थिरतेचे चटके सोसावे लागत असून, येत्या काळात अमेरिकी फेडची संभाव्य व्याजदर वाढ, तेलाच्या किमतीतील चढ-उतार, बडय़ा अर्थसत्तांमधील व्यापारयुद्ध आणि परस्परांकडून लादले जाणारे आर्थिक र्निबध वगैरे घटकांतून बाजार-अस्थिरतेचा पैलू आणखी तीव्र बनेल, असा इशारा ‘सेबी’ अध्यक्ष अजय त्यागी यांनी दिला; तथापि भारतीय भांडवली बाजारात डिसेंबर मध्यापर्यंत अस्थिरतेचे प्रमाण १२ टक्के होते, जे जागतिक तुलनेत सर्वात कमी होते, अशी पुस्तीही त्यागी यांनी जोडली. त्याउलट ब्रिटनमध्ये अस्थिरतेचे प्रमाण भारताइतकेच १२ टक्के, अमेरिकेत १६ टक्के, चीनमध्ये १९ टक्के, जपानमध्ये १७ टक्के, दक्षिण कोरियात १४ टक्के, हाँगकाँग १९ टक्के तर ब्राझीलमध्ये ते २१ टक्के होते, असे त्यांनी सांगितले.