News Flash

निर्देशांक एक पाऊल मागे, पुढच्या दोन पावलांसाठी!

निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

(संग्रहित छायाचित्र)

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी अगोदरचा अनुक्रमे २९,०००/ ९,००० अडथळा पार केल्यावर २९,८००/ ९,२०० चा ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. तेव्हापासून आजतागायत सेन्सेक्स ८०० गुणांच्या व निफ्टी निर्देशांक २०० गुणांच्या आखूड टप्प्यात (बॅन्डमध्ये) फिरत आहे व या बॅन्डचे यथार्थ वर्णन म्हणजे, समभाग खरेदी केले की भाव कोसळतात व विक्री केली तर भाव वाढतात.. ‘धरलं तर चावतं व सोडलं तर पळतं’ अशा द्विधा मन:स्थितीत आज गुंतवणूकदार आहेत.

तेव्हा निर्देशांकाची येणाऱ्या आठवडय़ातील संभाव्य वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

निर्देशांकाचा शुक्रवारचा बंद भाव:  सेन्सेक्स- २९,४२१.४०/ निफ्टी-  ९,१०८  येत्या दिवसांत निर्देशांक २९,८००/ ९,२०० या पातळ्यांवर पाच दिवस टिकल्यास, ३१,०००/ ९,३०० ते ९,४५० हे वरचे उद्दिष्ट असेल. त्याउलट निर्देशांक जर २९,८००/ ९,२०० चा स्तर ओलांडण्यास अपयशी ठरले तर फिरून ते २९,०००/ ९,००० पर्यंत खाली येतील. निर्देशांकांसाठी ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी असेल.

२९,०००/ ९,००० या पातळ्यांखाली संक्षिप्त मंदीची धारणा निर्माण होऊन निर्देशांक २८,५००/ ८,८०० पर्यंत खाली येऊ शकतो. तेथून मात्र शाश्वत अशा तेजीची नवनवीन दालने उघडली जातील आणि निफ्टी निर्देशांकाची ९,६०० – ९,८०० – १०,००० ते १०,३०० पर्यंत मजल जाईल.

निफ्टी – वाचक संवाद..

आज आपण गुंतवणुकीचे उद्योग क्षेत्र (सेक्टर) व त्या क्षेत्रातल्या कंपन्या कशा निवडायच्या ते पाहू. गुंतवणुकीसाठी उद्योग क्षेत्र निवडताना आपल्याला सरकारचे तसेच आंतरराष्ट्रीय धोरण, त्या क्षेत्राला मिळणाऱ्या सवलती व व्यापारउदीम चक्राचा विचार करावा लागतो. हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी ताजे उदाहरण घेऊ या.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने ‘गंगा जलशुद्धी प्रकल्प’ ऐरणीवर आला आहे. चाणाक्ष गुंतवणूकदारांनी पाणी शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्या हेरून त्यात पाण्यासारखा पसा ओतला व अल्पावधीत (डिसेंबर ते मार्च) या कंपन्यांचे भाव भरमसाट वाढले. हेच आपले आजचे लक्षणीय समभाग असतील.

उदाहरणार्थ-

ड्रेजिंग कॉर्पोरेशन  रु. ४४० ते ७१७

आयन एक्स्चेंज (रु. २८० ते ३९०)

त्रिवेणी इंजिनीयरिंग (रु. ५३ ते ८२)

मर्केटर लि. (रु. ३८ ते ५१)

वरील कंपन्यांचे भाव अशा जलद गतीने वाढले, की शुद्ध पाण्याची गंगा आली रे अंगणी असा आभास निर्माण झाला. त्यामुळे आता या स्तरावर हे समभाग खरेदी केले तर पसे पाण्यात जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात या कंपन्याच्या किमती खाली खरेदीयोग्य पातळीवर आल्यावर भाष्य करणे सयुक्तिक ठरेल. तूर्तास वाचकांनी या कंपन्या आपल्या स्मृतिपटलावर.. मनाच्या कोपऱ्यात (रडारवर) ठेवणे इष्ट ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:30 am

Web Title: bse nse nifty sensex part 2
Next Stories
1 सॅमसंगची मोबाइल पेमेंट सेवा
2 महाभारतावर आधारित गुंतवणुकीसंबंधीचे धडे..
3 तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारउत्सुकांपुढे अंध:कारमय चित्र
Just Now!
X