शेअर बाजारात गुरुवारी गडगडला असून सेन्सेक्स ५७२ अंकांनी गडगडला. तर निफ्टीमध्येही घसरण झाली असून या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अमेरिका – चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्चिततेचे वातावरण, रुपयाचे अवमूल्यन आणि पुढील आठवड्यात लागणारे निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. निफ्टी तब्बल १८१ अंकांनी घसरुन १०, ६०१ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ५७२ अंकांनी घसरुन ३५, ३१२ वर बंद झाला. बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात सर्वाधिक घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचे भांडवली मूल्य ५ डिसेंबर रोजी १४२ लाख कोटी रुपये इतके होते. ते मूल्य ६ डिसेंबरला १३९. ७२ लाख कोटी रुपये इतके झाले. आज दिवसभरात गुंतवणूकदारांचे २. २८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

युवाय (Huawei) या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीच्या ग्लोबल फायनान्शियल ऑफिसरला आर्थिक बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अटक झाली आहे. परिणामी चीन व हाँगकाँगमधल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सना चांगलाच फटका बसला. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटल्याचे दिसून आले आणि भारतीय गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला.