नव्या वर्षांत सलग दुसऱ्या दिवशी घसरताना मुंबई निर्देशांक सप्ताहअखेर २०,८५१.३३ पर्यंत आला. कालच्या तुलनेत त्यात ३७ अंश घसरण नोंदली गेली. गेल्या दोन महिन्यांत सर्वात मोठी साप्ताहिक आपटी या रूपाने नोंदविली गेली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० अंशाने खाली येत ६,२११.१५ वर स्थिरावला.
राजधानीत पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलेल्या दुर्मीळ पत्रकार परिषदेचा कोणताही परिणाम भांडवली बाजाराने झेलला नाही.
२०१४ सुरू झाले तसे भांडवली बाजारात नकारात्मक वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई निर्देशांकातच २८९ अंशांची घसरण झाली, तर आठवडय़ातील घट ही ३४२ अंशांची आहे. यामुळे २०१३च्या अखेरीस असलेला सेन्सेक्स २१ हजारांच्याही खाली आला (८ नोव्हेंबरनंतर यंदाची सुमार साप्हाहिक आपटी राहिली आहे.).बाजारात कालही नफेखोरीमुळे निर्देशांक नकारात्मकतेत होता. भक्कम डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना शुक्रवारीही मागणी राहिल्याने बाजारात पुन्हा घट झाली. १५० अंशांच्या घसरणीचे सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक दिवसभरात २०,७३१.३३ नीचांक नोंदविता झाला. बाजाराच्या सप्ताहातील शेवटच्या दिवशी अखेरच्या अध्र्या तासात घसरण जलद विस्तारली.
रिलायन्स, एलअ‍ॅण्डटी, टाटा मोटर्स आदी बडे समभाग घसरणीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसह आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी समभागांची विक्री झाली. टीसीएस, एचडीएफसी बँकसह सेन्सेक्समधील ११ समभाग तेजीत राहिले. तर १२ पैकी ५ क्षेत्रीय निर्देशांक घसरले. डिसेंबरमध्ये अनेक वाहन कंपन्यांनी विक्री घट नोंदविल्याने या क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभागही रोडावले. निर्देशांक घसरणीचा सर्वाधिक फटका १.७४ टक्क्यांसह ऊर्जा निर्देशांकाला बसला.
नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी सुटी घेणाऱ्या अनेक जागतिक शेअर बाजारांनी २०१४ मधील व्यवहाराच्या पहिल्या सत्रात संमिश्र प्रतिसाद नोंदविला.