चालू सप्ताहाची अखेर आणि नव्या महिन्याची सुरुवात करताना भांडवली बाजारांनी शुक्रवारी मोठी आपटी नोंदविली. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि शेअर बाजारांवर प्रतिक्रिया नोंदवित सेन्सेक्ससह निफ्टीही गेल्या तीन महिन्यातील मोठय़ा घसरणीने खाली आले. परिणामी सेन्सेक्स तर २५,५०० च्याही तर निफ्टीने कसा बसा ७,६०० च्या वरचा स्तर राखला.
४१४.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,४८०.८४ पर्यंत खाली आला. तर ११८.७० अंश घसरणीमुळे निफ्टी ७,६०२.६० वर स्थिरावला. प्रमुख निर्देशांकांची शुक्रवारची एकाच व्यवहारातील घसरण ही ८ जुलैनंतरची सर्वात मोठी ठरली. यादिवशी सेन्सेक्स ५१८ तर निफ्टी १६४ अंशांनी कोसळला होता. सुरुवातीच्या व्यवहारात दिवसाच्या २५,८६२ या उच्चांकावर असणारा सेन्सेक्स दुपारनंतर थेट २५,४५९.१३ या सत्राच्या नीचांकावर येऊन ठेपला.
कमकुवत युरोझोनमधील आर्थिक आकडेवारी, अर्जेटिनाचे वाढते बुडते कर्ज, अमेरिकेतील बेरोजगारांचे वाढते प्रमाण या साऱ्यांचा मिलाफ युरोपीय शेअर बाजारांच्या १.५ ते २ टक्क्यांच्या घसरणीत दिसून आला. त्यावर आशियातील प्रमुख शेअर बाजारांनीही व्यवहार नोंदविले. हेच चित्र मुंबई शेअर बाजारातही सप्ताहअखेर दिसले.
नव्या महिन्याच्या पहिल्या दिवसातील सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या रुपात नोंदले गेले. त्यांच्यात ०.९ ते ३.२७ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली. ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू, भांडवली वस्तू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान हे घसरणीत पुढे होते. सेन्सेक्समध्ये रिलायन्स, एचडीएफसी, आयटीसी, टीसीएस, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, सन फार्मा, टाटा मोटर्स हे घसरले.सेन्सेक्समधील तब्बल २५ कंपनी समभाग घसरले. त्यात रिलायन्स आणि ओएनजीसी या बाजारमूल्यातील आघाडीच्या समभागांचाही समावेश राहिला.
मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पानंतर ८ जुलै रोजी मोठय़ा फरकाने आपटलेला भांडवली बाजाराने ६४६ अंशांच्या नुकसानासह सप्ताहाची अखेर नोंदविली आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या दोन सप्ताह तेजीला त्याने पायबंद घातला आहे.
गुरुवारी उशिरा जाहिर झालेल्या प्रमुख क्षेत्रातील वाढीच्या आलेखाकडेही भांडवली बाजारांनी शुक्रवारी दुर्लक्ष केले. भांडवली बाजाराचा आता नव्या सप्ताहाचा प्रवास रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर प्रतिक्रिया देणारा असेल. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण येत्या मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी सादर होत आहे. महागाई अद्यापही स्थिरावली नसल्याने गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याकडून पुन्हा एकदा ‘जैसे थे’ धोरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रुपयाची ६१ ला गवसणी; भक्कम डॉलरने धडकी
परकी चलन व्यवहारात रुपयानेही ६१ ची पातळी गाठत शुक्रवारी धास्ती निर्माण केली. तीन महिन्यातील नीचांकाला पोहोचलेल्या रुपयाला पाहून भांडवली बाजारातही धडकी भरली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून रोखे खरेदी आटोपती घेण्याच्या शक्यतेने डॉलर गेल्या दोन दिवसांपासून भक्कम होऊ पाहत असताना त्याच्या तुलनेत रुपयाने सप्ताहअखेरिस ६३ पैशांची आपटी नोंदवित ६१ च्या खाली, ६१.१८ पर्यंत राहणे पसंत केले.
सप्ताहअखेरचा स्थानिक चलनाचा सत्रातील व्यवहार ६१.१९ व ६०.६९ या अनुक्रमे दिवसाच्या नीचांक व उच्चांकावर राहिला.
जागतिक व्यापार परिषदेच्या करारावर भारताकडून स्वाक्षरी न करणेही गुंतवणूकदारांची नाराजी ओढविणारे ठरले आहे, अशी प्रतिक्रिया डॉलर-रुपयाच्या शुक्रवारच्या प्रवासाबाबत इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गोयंका यांनी दिली आहे. भारतीय चलनाचा यापुढील स्तर ६१.२० ते ६१.५० दरम्यान राहिल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.