एक दिवसाच्या विश्रांतीनंतर खुल्या झालेल्या भांडवली बाजारात आगामी दोन दिवसांच्या सुटीआधी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा अवलंब केला आणि सलग ऐतिहासिक उच्चांक दौड सुरू असलेले निर्देशांक शुक्रवारी काहीशी माघार घेत सपाटीवर स्थिरावले.
 सेन्सेक्स या आधी व्यवहार झालेल्या म्हणजे बुधवारच्या २७,९१५ पातळीवरून शुक्रवारच्या व्यवहारांत२७,९८० पर्यंत उंचावत, दिवसअखेर ४७.२५ अंश घसरणीसह २७,८६८.६३ वर स्थिरावला. तर १.३० अंश घसरणीसह निफ्टी ८,३३७.०० वर येऊन थांबला. कळसाला पोहोचलेल्या भावाचा लाभ उठवत समभागांची विक्री करत, नफ्याची संधी आज साधण्यात आली. परिणामी दोन्ही निर्देशांक त्यांच्या अनुक्रमे २८ हजार व ८,३५० पातळ्यांपासून दुरावले आहेत.
गेल्या सातपैकी पाच व्यवहारांत दोन्ही प्रमुख निर्देशांक उंचावले आहेत. या वेळी त्याने ऐतिहासिक उंचीचा टप्पाही मागे टाकला. बुधवारी सेन्सेक्स व्यवहारात २८ हजार पार करत अखेर २७,९१५ या वरच्या टप्प्यावर पोहोचला होता. शुक्रवारच्या सत्रात २८ हजारांचा प्रवास अनुभवता आला नसला तरी मुंबई निर्देशांक व्यवहारात २७,९८०.९३ पर्यंत गेला होता.

रुपया ६१.६०च्याही खाली
सशक्त बनत चाललेल्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने शुक्रवारी मोठी गटांगळी खाल्ली. एकाच व्यवहारात स्थानिक चलन तब्बल २१ पैशांनी रोडावत ६१.६२ पर्यंत घसरले. चलनाचा हा १६ ऑक्टोबरनंतरचा सर्वात खालचा स्तर आहे. दोन आठवडय़ांपूर्वी रुपया प्रति डॉलर ६१.८३ पातळीवर होता.