मुंबई शेअर बाजारातील व्यवहारासाठी लघू व मध्यम उद्योगांकरिता असलेल्या स्वतंत्र व्यासपीठाने गुरुवारी १०० कंपन्यांचा टप्पा पार केला. गुरुवारी या व्यासपीठावर नवीन पाच कंपन्यांनी आपली वर्दी देत ‘बीएसई एसएमई मंचावरील कंपन्यांची संख्या १०४ पर्यंत नेण्यास सहकार्य केले.
गाला प्रिंट सिटी, एम. डी. इंडक्टो कास्ट, लॉयल एक्विपमेंट्स, जिया इको प्रॉडक्ट्स आणि मॅजेस्टिक रिसर्च सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड सोल्युशन्स या कंपन्यांची या स्वतंत्र मंचावर मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान आणि अध्यक्ष एस. रामदोराई यांच्या उपस्थितीत नोंदणी झाली. सेबीचे पूर्णवेळ सदस्य राजीव कुमार अगरवाल हेही या वेळी उपस्थित होते. या पाचपैकी चार कंपन्या गुजरातस्थित तर मॅजेस्टिक रिसर्च सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड सोल्युशन्स ही कंपनी कर्नाटकातील आहे. यापैकी तीन कंपन्यांच्या भागविक्रीचे प्रधान व्यवस्थापक म्हणून मुंबईस्थित पेंटोमाथ अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिसेस या कंपनीने काम पाहिले.
१२ मार्च २०१२ रोजी अस्तित्वात आलेल्या या मंचाच्या माध्यमातून लघू व मध्यम क्षेत्रातील कंपन्यांनी आतापर्यंत ७५६ कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभारले असून, ते आपल्या व्यवसाय विस्तारासाठी कामी आणले आहेत.
देशात हजारो लघू व मध्यम उद्योग सुस्थितीत असून त्यांनी भांडवली बाजारात प्रवेश करावा, असे आवाहन चौहान यांनी या वेळी केले. येत्या दोन ते तीन महिन्यांत या गटातील आणखी २० ते २५ कंपन्या स्वतंत्र व्यासपीठावर सूचिबद्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षअखेर या मंचावरील लघू व मध्यम उद्योगांची संख्या सध्या तुलनेत दुपटीहून अधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.