नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार सेवा पुरवठादार भारत संचार निगम लि. (बीएसएनएल)ने जागतिक अनावरणाच्या बरोबरीनेच भारतातही पाचव्या पिढीतील अर्थात ५जी तंत्रज्ञानावर आधारीत अतिवेगवान सेवा सुरू करण्याची संपूर्ण सज्जता केली असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

बीएसएनएलकडून ५जी सेवा या जागतिक स्तरावर ती ज्या दिवशी सुरू होईल त्याच दिवशी सुरू केली जाईल, असे बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अनिल जैन म्हणाले. बीएसएनएलने ५जी तंत्रज्ञानाच्या सज्जतेसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, नोकिया, कोरिएण्ट आणि झेडटीईसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सामंजस्य करार आणि एकत्रित योजना बनवून ती कार्यरत आहे. या योजनांनुसार २०२० सालात उद्योग क्षेत्र तसेच सामान्य ग्राहकांसाठी ५जी सेवांचे दालन खुले केले होणे अपेक्षित आहे.

दूरसंचार उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘द मोबाइल असोसिएशन (टॅम)’ने आयोजित केलेल्या चर्चात्मक परिषदेच्या व्यासपीठावरून बोलताना, बीएसएनएलचे जैन यांनी ३जी आणि ४जी तंत्रज्ञानावर आधारित सेवा भारतात जगाच्या तुलनेत खूप उशिराने आल्या. ५जी सेवांबाबत अशी दिरंगाई होणार नाही.

स्मार्टफोनची उपलब्धता मात्र प्रश्नार्थक

चालू वर्षांत फेब्रुवारीमध्ये बीएसएनएलने ५ जी सेवांच्या चाचणीसाठी जपानच्या एनटीटी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची भारतीय भागीदार व्हर्गो कॉर्पोरेशनबरोबर सामंजस्याचा करार केला आहे. दूरसंचार कंपन्यांनी या नवागत सेवेसाठी व्यापारी तत्त्वावरील प्रस्तुतीपूर्वी चाचणी-परीक्षणे तीव्रतेने सुरू केल्या असल्या तरी ५जी समर्थ स्मार्टफोनची उपलब्धता आणि त्या दिशेने संक्रमणही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ‘टॅम’च्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.