खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेतर्फे फेडबुक या ‘ट्रेंडसेटर इलेक्ट्रॉनिक पासबुक’ची नवी आवृत्ती दाखल केली आहे. या पासबुकने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. ग्राहकांना समाधान देत, फेडबुकमध्ये आता आणखी आकर्षक वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात आली आहेत. फेडबुकच्या नव्या आवृत्तीद्वारे ग्राहकांना आता त्यांच्या कर्जखात्यावर लक्ष ठेवता येईल, धनादेशाचा मागोवा घेता येईल आणि ठेवी सोयीनुसार पाहता येतील. फेडबुकची नवी आवृत्ती खातेधारकांना चालू जमा, व्याजदर, कर्जाचा कालावधी, हप्त्याची रक्कम, रेमिटन्सची अंतिम तारिख, विविध कर्जासाठीची मुदत आदी तपशील त्यांच्या मोबाईलफोनवर मिळेल. पुनर्गुतवणूक योजनेसह ठेवी (कॅश सर्टििफकेट), रिकिरग व मुदतठेवी अशा ठेवींच्या बाबतीत ओपिनग बॅलन्स, लेटेस्ट बॅलन्स, व्याजदर, ठेवी सुरू करण्याची तारीख, मुदतपूर्ती, ठेवींचा कालावधी पाहता येईल. हे अप्लिकेशन ठेवींच्या मुदतपूर्तीच्या क्रमानुसार सगळय़ा ठेवींची यादीही देऊ शकते. फेडबुकची नवी आवृत्ती दाखल करताना फेडरल बँकेच्या तंत्रज्ञान व डिजिटल बँकिंग विभागाचे प्रमुख सनी के. पी. म्हणाले, फेडबुकची नवी आवृत्तीही ग्राहकांना त्यांचे धनादेश क्लिअिरग हाउसला गेल्यापासून – म्हणजे प्रत्यक्षात त्यांचे अकाउंटिंग होण्यापूर्वीपासून – पुढील मागोवा घेण्याची सुविधा देते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या रकमांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या वैशिष्टय़ांचा लाभ घेण्यासाठी, गुगल प्ले स्टोअरवरून नवी आवृत्ती डाउनलोड करावी लागेल. आयओएस, िवडोज व ब्लॅकबेरी यासाठीची नवी आवृत्ती लवकरच जाहीर केली जाईल.
आयसीआयसीआय बँकेतर्फे चार नवे मोबाइल बँकिंग अ‍ॅप
मुंबई : आयसीआयसीआय बँक या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेने ग्राहकांसाठी चार नवे बँकिंग अ‍ॅप दाखल केले आहेत. आयसीआयसीआय स्टोअर अ‍ॅपमुळे बँकेने दाखल केलेले सर्व मोबाइल अ‍ॅप ग्राहकांना एकाच ठिकाणी पाहता येतील. दाखल झालेल्या नव्या अ‍ॅपच्या वापराने ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी व्यवहारांना सुरूवात करता येईल. व्हीडिओ कॉलमुळे सेवेशी संबंधित अधिकाऱ्यांशी जोडले जाता येईल आणि मोबाइलवर फोनवर गेल्या महिन्याभरातील त्यांचे व्यवहार पाहता येईल. नवे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी ते गुगल प्लेवर उपलब्ध आहेत आणि लवकरच अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरही उपलब्ध होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. याविषयी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर म्हणाल्या, आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी इंटरनेट, मोबाइल, टॅब व टच बँकिंग असे अनेक कल्पक पर्याय यापूर्वीही दाखल केले आहेत. नव्या मोबाइल अ‍ॅपसह ग्राहकांना बँकेसोबत संवाद साधण्याचा विशेष आणि अप्रतिम अनुभव मिळेल. आयसीआयसीआय बँक मोबाइल बँकिंगमधील प्रणेती आहे. बँकेने २००८ मध्ये  ‘आयमोबाइल’ हे देशातील पहिले मोबाइल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन दाखल केले होते. बँक बाजारातील एक चतुर्थाश हिस्सा मिळवत मोबाइल बँकिंग क्षेत्रात आघाडीवर आहे. जूनमध्ये एका महिन्यात एक हजार कोटी रुपयांचा मलाचा दगड पार करणारी ती पहिली बँक ठरली.
‘पेटीएम’तर्फे पूरग्रस्तांसाठी ‘जेअँडके रिलिफ फंड’
मुंबई : पेटीएम या भारतातील आघाडीच्या मोबाइल कॉमर्स कंपनीने जम्मू आणि काश्मीर येथील पूरग्रस्तांसाठी विशेष सहाय्य जाहिर केले आहे. पूरग्रस्त काश्मीरच्या खोऱ्यातील नागरिकांच्या सुटका व पुनर्वसनासाठी ‘रिलिफ फंड’ जमवण्याचे कंपनीने ठरवले असून त्यासाठी भरघोस मदत करण्याचे आवाहन केले जाणार आहे. याबाबत ‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधले पाणी आता ओसरायला सुरुवात झाली असून स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. या परिस्थितीत नागरिकांचे पुनर्वसन करणे आणि आजारांना दूर ठेवण्याचे आव्हान या राज्यासमोर आहे. ‘रिलिफ फंडा’साठी मिळालेल्या निधी इतक्याच निधीची भर पेटीएम कंपनीदेखील देणार आहे. हे दोन्ही निधी एकत्र करून पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीत त्याची भर घातली जाणार आहे. यानुसार ‘पेटीएम’चे देयक भरताना भरताना किंवा रिचार्जचे पसे देताना १० रुपयांपासून ५०० रुपयांच्या किंमतीचे कूपन घेऊन देणगी देण्याचा पर्याय सुचवला जाणार आहे. त्याप्रमाणे संबंधितांनी देणगी ठरवून त्याचे पसे त्यांच्या बिलाच्या किंवा रिचार्जच्या किंमतीत जोडले जातील.
ऑक्टोबरमध्ये मुंबईत ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन समिट’
मुंबई : देशातील सोन्याच्या लगडी आणि जडजवाहिर व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘इंडिया बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड’ (आयबीजेए) ने आपल्या ६६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन समीट’ ही दुसरी शिखर परिषद येत्या ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित  केली आहे. संघटनेचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी याबाबत सांगितले की, म्हणाले, आज भारत हा सोन्याच्या लगडी आणि जवाहीर यांमधील एक प्रमुख बाजारपेठ आहे. त्या पाश्र्वभूमीवर या शिखर परिषदेमध्ये लोक जगभरातून अधिक प्रमाणात आणि अधिक सक्रीयपणे सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
अलिबाबाच्या गुहेत बँकही
बिजिंग : अमेरिकेच्या भांडवली बाजारात प्रवेश करत जगातील सर्वात मोठी भागविक्री प्रक्रियेचा घंटानाद करणाऱ्या अलिबाबा या चीनी इ-कॉमर्स कंपनीला आता बँक खुली करण्यासाठीही परवानगी मिळाली आहे. कंपनीच्या झेजिआन्ग अ‍ॅन्ट स्मॉल अ‍ॅण्ड मायक्रो फिनान्शिअल सव्‍‌र्हिसेस ग्रुपच्या माध्यमातून अलिबाबाला वित्तसेवा सुरू करण्यासाठी खासगी बँक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मुख्य अलिबाबा या कंपनीत ३० टक्के हिस्सा राखत असल्याचे चीनच्या बँक नियामक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामाध्यमातून कंपनी ऑनलाईन पेमेन्ट तसेच संपत्ती व्यवस्थापन उत्पादने सादर करेल.
भारतीय इ-कॉमर्सला चीनी अलिबाबाच्या माध्यमातून आव्हान उभे ठाकले असतानाच देशातील आघाडीच्या तीन कंपन्यांनी अब्जावधी गुंतवणुकीचे इमले पुन्हा बांधायला घेतले आहेत. रिटेल क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फ्युचर समुहाचे किशोर बियाणी यांनी मात्र एकूणच इ-कॉमर्सवर शाब्दिक चढाई सुरू केली आहे. अशा कंपन्यांमध्ये येऊ घातलेल्या अब्जावधी रक्कम गुंतवणुकीवर नजरा वळत असल्या तरी (या कंपन्यांच्या) ढोबळ नफ्याचे काय, असा सवाल बियाणी यांनी केला आहे. कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे खरे गमक म्हणजे हाच आकडा असून त्यात यापैकी कोणत्याही कंपन्या सकारात्मक निश्चितच नाही, असा दावाही त्यांनी केला.