बांधकाम क्षेत्रातील साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रान्सच्या ‘पॅरेक्स समूहा’ने मुंबईतील ‘अपूर्व इंडिया लि.’ या कंपनीसह भागीदारी केली आहे. ‘पॅरेक्स ग्रुप कन्स्ट्रक्शन प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ असे या कंपनीचे नाव असून पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प आणि औद्योगिक बांधकामाच्या क्षेत्रातील व्यावसायिक संधी हे उद्दिष्ट ठेवून ही कंपनी काम करणार आहे.
‘पॅरेक्स’ जगभरातील २६ देशांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री करते. मागील आर्थिक वर्षांतील त्यांची एकूण विक्री ९०० दशलक्ष डॉलर इतकी होती. भारतात पायाभूत सुविधा क्षेत्र आणि औद्योगिक, व्यापारी आस्थापनांचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे आता भारतात व्यवसायाची संधी मोठी आहे. पहिल्या टप्प्यात वॉटरप्रुफिंग आणि काँक्रिट संरक्षक साहित्याच्या क्षेत्रातील उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे. वर्षांखेपर्यंत भारतातच उत्पादन प्रकल्प टाकण्याचा प्रयत्न असल्याचे ‘पॅरेक्स ग्रुप कन्स्ट्रक्शन प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काटे यांनी सांगितले.
रत्नाकर बँकेच्या हैद्राबादमधील पहिल्या शाखेचे उद्घाटन
रत्नाकर बँक लिमिटेड या ७० वर्षांचा इतिहास असलेल्या खाजगी क्षेत्रातील अधिसूचित वाणिज्य बँकेने हैद्राबाद शहरामध्ये तिच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ करून आंध्र प्रदेश राज्यातील प्रवेशाची घोषणा केली आहे.व्यावसायिक प्रशासन, तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे भांडवल यांच्या आधारे कात टाकणाऱ्या रत्नाकर बँकेने आता भौगोलिक विस्ताराच्या आधारावर आक्रमक वाटचाल अनुसरल्याचे संकेत दिले आहेत.
हैदराबादमधील शाखेचे उद्घाटन बँकेचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुज यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता अजित रांगणेकर, हैद्राबादचे पोलिस आयुक्त अनुराग शर्मा आणि बेसिक्सचे संस्थापक अध्यक्ष विजय महाजन तसेच विशेष अतिथी म्हणून अपोलो हॉस्पिटल समूहाच्या कार्यकारी संचालिका संगीता रेड्डी आणि कोरोमंडल इंटरनॅशनल लि.चे व्यवस्थापकीय संचालक कपिल मेहान उपस्थित होते.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये लक्षणीय उपस्थिती असलेल्या रत्नाकर बँकेचा गुजरात, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही विस्तार होत आहे. बँकेचे लक्ष्य एक व्यापक भारतीय ओळख साध्य करण्याचे असल्याचे आहुजा यांनी सांगितले.
मालाड सहकारी बँकेची ‘बालिका कल्याण योजना’
मुलींना आर्थिक स्वावलंबन देण्याच्या उद्देशाने मालाड सहकारी बँक ‘बालिका कल्याण योजना’ नावाची अभिनव योजना प्रस्तुत करीत आहे.  विशेषत: मुलींच्या उज्ज्वल शैक्षणिक व आर्थिक भवितव्यावर भर देणाऱ्या या योजनेचा शुभारंभ येत्या मंगळवारी १२ मार्च रोजी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते यज्ञ वाटिका सभागृह, पोद्दार पार्क, पोद्दार रोड, मालाड पूर्व येथे सायंकाळी ७.३० वा. समारंभपूर्वक होईल.