मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेवरील नवीन डेप्युटी गव्हर्नरपदाचा उमेदवार केंद्रातील कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वात स्थापित निवड समिती शुक्रवारी निश्चित करणार आहे. छाननीअंती इच्छुकांच्या अंतिम यादीतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर ही निवड होणे अपेक्षित आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांनी तब्येतीच्या कारणास्तव, नियोजित कार्यकाळाच्या तीन महिने आधीच म्हणजे ३१ मार्च रोजी पदाचा राजीनामा दिला. मुद्रा धोरण विभागात तब्बल ३९ वर्षांचा सेवा काळ असणारे विश्वनाथन हे रिझव्‍‌र्ह बँकेवरील सर्वात वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी केंद्रातील कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वातील समितीने ७ ऑगस्टला प्राथमिक बैठक करून या प्रक्रियेला सुरुवात केली.

‘वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती’ने डेप्युटी गव्हर्नरपदासाठी आठ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. या उमेदवारांच्या दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने शुक्रवारी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. कॅबिनेट सचिवांव्यतिरिक्त या समितीत, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, केंद्रीय वित्तीय सेवा सचिव आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे.

डेप्युटी गव्हर्नरांचे हे रिक्त पद मध्यवर्ती बँकेतील अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे भरले जाणे अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडे पर्यवेक्षण आणि नियामक कार्यावर देखरेखीची जबाबदारी असेल. रिझव्‍‌र्ह बँक कायदा, १९३४ नुसार, मध्यवर्ती बँकेवरील चार डेप्युटी गव्हर्नरांपैकी दोघांची अंतर्गत अधिकारी श्रेणीतून, तर अन्य दोघांपैकी एक वाणिज्य बँकांच्या प्रमुखांमधून, तर दुसरा अर्थशास्त्रज्ञांमधून निवडला जातो. बी. पी. कानुगो, एम. के. जैन आणि मायकेल देबब्रत पात्रा असे तीन विद्यमान डेप्युटी गव्हर्नर आहेत. कानुगो यांचा कार्यकाळही २ एप्रिलला संपुष्टात आला असून, त्यांना वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रारंभी तीन वर्षांच्या कालावधीसाठी डेप्युटी गव्हर्नराची निवड केली जाते आणि पात्रतेनुसार हा कार्यकाळ वाढविलाही जातो.