पतनिश्चिती संस्था दोष निवारणासाठी घाईवर

मुंबई : पतनिश्चिती संस्था ‘इक्रा’पाठोपाठ आता केअर रेटिंग्जच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी राजेश मोकाशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे दाखल एका निनावी तक्रारीसंबंधाने तपास व चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.

केअरच्या संचालक मंडळाने मोकाशी यांच्या जागी कंपनीचे विद्यमान कार्यकारी संचालक (पतनिश्चिती) टी. एन. अरुण कुमार यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पतनिर्धारण प्रक्रियेचे स्वातंत्र्य व निष्पक्षता अबाधित राखण्यासाठी यापुढे टी. एन. अरुण कुमार पतनिश्चिती समितीचे सदस्य असणार नाहीत, असे बुधवारी संध्याकाळी केअर रेटिंग्जने मुबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांना कळविले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीस, मूडीज् इन्व्हेस्टर्स सर्व्हिसची उपकंपनी आणि पतनिश्चिती कंपनी ‘इक्रा’ने त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी नरेश ठक्कर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, आयएल अँड एफएस समूहातील कंपन्यांना मुदतपूर्ती झालेल्या कर्जरोख्यांची भरपाई करण्यात कसूर केल्यानंतर, बँकेतर वित्तीय कंपन्यांना मोठय़ा रोकडसुलभतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आयएल अँड एफएस समूहाच्या अनेक उपकंपन्यांनी मोठय़ा रकमा कर्जाऊ घेताना किमान अटींचे पालन केले नसल्याचा आरोप असून या आरोपांची ‘सेबी’ चौकशी करीत आहे.

पतनिश्चिती संस्थांवर संशयाची सुई..

‘आयएल अँड एफएस’ प्रकरणाच्या परिणामी तरलतेच्या समस्येबरोबरीनेच, हजारो रोखे गुंतवणूकदारांना कोटय़वधींचे नुकसानही सोसावे लागले आहे. या संकटाला कारणीभूत घटकांचा ‘सेबी’सह वेगवेगळ्या तपास यंत्रणा माग घेत आहेत. तथापि मुळात पतनिश्चिती संस्थांच्या या संबंधाने भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सदोष मानांकन आणि योग्य वेळी सुधारात्मक कारवाई करण्यात कुचराई किंबहुना विलंबाने टाकले गेलेले पावलांवरून टीकाटिप्पणी होत आहे. ‘ट्रिपल ए’ ही सर्वोच्च पत मिळविण्यासाठी आयएल अँड एफएसच्या उच्चपदस्थांनी वेगवेगळ्या पतनिश्चिती संस्थांच्या प्रमुखांशी संधान साधल्याचा आरोप ‘सेबी’कडे दाखल झालेल्या तक्रारीत असल्याचे समजते. ‘इक्रा’मधील उच्चपदस्थांची या संबंधाने मे महिन्यात अंतर्गत चौकशीही झाल्याचे वृत्त आहे. इक्राने त्या पश्चात १ जुलैपासून तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी नरेश ठक्कर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.