कार किंवा मोटरसायकल विकत घेणं उद्या एक सप्टेंबरपासून महागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा इरडा या विमा नियंत्रकाच्या निर्देशांनुसार उद्यापासून दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा उतरवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार इरडानं हे निर्बंध लागू केले आहेत.

एक हजार सीसी खालील गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 5,286 रुपये मोजावे लागणार आहेत, एक हजार ते दीड हजार सीसी मधल्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 9,534 रुपये तर दीड हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 24,305 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मोटरसायकलच्या बाबतीत पाच वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यापोटी 75 सीसी खालील गाड्यांना 1,045 रुपये, 75 ते 150 सीसी मधल्या गाड्यांना 3,285 रुपये, 150 ते 350 सीसी मधल्या गाड्यांना 5,453 रुपये तर 350 सीसी वरील गाड्यांना 13,034 रुपये इतका प्रीमियम भरावा लागणार आहे.

मोटर वेहिकल अॅक्टनुसार थर्ड पार्टी विमा काढणं बंधनकारक आहे. आधी हा विमा एका वर्षाचा मिळायचा, परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहनचालक विम्याचे नूतनीकरण नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, अपघातांमध्ये त्रयस्थ व्यक्तिंना विम्याचे संरक्षण त्यामुळे मिळत नसल्याचे समोर आल्यावर सुप्रीम कोर्टाने गाडी विकतानाच दीर्घ मुदतीचा काढावा असे आदेश इरडाला दिले. या आदेशाची अमलबजावणी इरडानं उद्यापासून करण्याचे निर्देश विमा कंपन्यांना दिले आहेत.

कार्सच्या बाबतीत तीन वर्षांचा व मोटरसायकलच्या बाबतीत पाच वर्षांचा थर्ड पार्टी विमा काढण्याचे बंधन या निर्देशांनुसार इरडानं दिले असून उद्यापासून त्याची अमलबजावणी होणार आहे, परिणामी सगळ्या नवीन कार अथवा मोटरसायकल खरेदी करताना आधीप्रमाणे एका वर्षाचा नाही तर जास्त वर्षांचा विमा काढावा लागणार आहे आणि त्यापोटी जास्त रक्कम गाडी विकत घेतानाच मोजावी लागणार आहे.