20 September 2020

News Flash

‘सेंट्रल बँके’च्या शहरातील १२ शाखांना टाळे

खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि मुंबईकरांकडून स्थापण्यात आलेल्या राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँकेच्या मुंबईतील १२ शाखा बंद करण्यात आल्या आहेत.

| November 1, 2014 01:30 am

स्थापनेचे शतक पूर्ण केलेल्या आणि खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि मुंबईकरांकडून स्थापण्यात आलेल्या राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँकेच्या मुंबईतील १२ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. बंद झालेल्या बहुतांश शाखा या दक्षिण मुंबईतील असून, या बँकेची स्थापना जेथून झाली ती शेअर बाजार शाखा व नरिमन पॉइंटस्थित जुन्या शाखेचाही यात समावेश आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी बँकांच्या शाखा थेट ग्रामीण भागात उघडण्याचा प्रघात सुरू असून, अपरिहार्य अशा व्यावसायिक जुळवाजुळवीतून बँकेच्या व्यवस्थापनाला शहरातील शाखाविस्तारावर अंकुशाचा निर्णय घेणे भाग ठरले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बँकेच्या विभागीय परिमंडळाचेही एकत्रीकरण सुरू असून याअंतर्गत आतापर्यंत आग्रा – लखनऊ, मुझफ्फरपूर-पाटणा, संबलपूर-रायपूर, देहरादून-दिल्ली परिमंडळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. विभागांच्या एकत्रीकरणामध्ये महाराष्ट्रातील पुणे – नागपूर विभागांचाही समावेश आहे.
देशातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांची स्थापना ही ब्रिटिश काळात आणि मुख्यत: गोऱ्या प्रवर्तकांकडून केली गेली आहे. त्या उलट फिरोजशाह मेहता व सोराबजी पोचखानवाला या स्वदेशी मंडळींनी डिसेंबर १९११ मध्ये मुंबईत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. आगामी डिसेंबर महिन्यात ही बँक स्थापनेची १०४ वर्षे पूर्ण करीत आहे.  काही महिन्यांपूर्वीपर्यंत बँकेच्या मुंबई क्षेत्रात ९० हून अधिक शाखा होत्या. बँक व्यवस्थापनाने त्यापैकी १२ शाखा टप्प्याटप्प्याने बंद केल्या आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील १०, तर उत्तर मुंबईतील दोन शाखांचा समावेश आहे.e01‘सेंट्रल बँक एम्प्लॉईज युनियन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांना याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, बँकेच्या शाखा बंद करण्यात येणार नाहीत, असे लेखी आश्वासन मिळूनही व्यवस्थापनाने मात्र हे पाऊल उचलले आहे. व्यवस्थापन टप्प्या टप्प्याने शाखा कमी करून आर्थिक राजधानीतील बँकेचे मुख्यालयही अहमदाबाद येथे नेईल का, अशी आम्हाला भीती वाटत आहे.
जनजागृतीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप
वेतनवाढीसह अन्य बँक संघटनांनी येत्या महिन्यातील एक दिवसाच्या संपाची हाक दिली असतानाच सेंट्रल बँकेच्या कर्मचारी संघटनेने मात्र थकीत कर्ज व कर्ज वसुलीच्या जनजागृतीसाठी एक दिवसाचा संप पुकारण्याचा निराळा मार्ग अवलंबिला आहे. सार्वजनिक बँकेचे ४,२०० कोटी रुपयांहून अधिक बुडीत कर्ज व त्यामुळे बँकेचे पुन्हा तोटय़ात येणे यासाठी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत असल्याचा आरोप करत ‘सेंट्रल बँक एम्प्लॉईज युनियन’चे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी याबाबत जागृतीसाठी ५ नोव्हेंबरच्या संपाची घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:30 am

Web Title: central bank to shut 12 branches in mumbai
Next Stories
1 भांडवली बाजारातही झेप सोहळा..
2 सोन्यात मोठी घसरण
3 स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ सीएनजी, पीएनजीही महाग
Just Now!
X