युरोपीय कंपनीतील हिस्सा आता चिनी कंपनीकडे!

विद्युत उपकरणनिर्मितीतील आघाडीच्या हॅवेल्स इंडियाने तिच्या सिल्व्हेनिया या युरोपीयन उपकंपनीतील मोठा हिस्सा चीनच्या कंपनीला बहाल केला आहे.
१,०९० कोटी रुपयांना (१४.८८ कोटी युरो) हॅवेल्स इंडियाने सिल्व्हेनियातील ८० टक्के हिस्सा शांघाय फिलो ऑस्टीक्स कंपनीला विकला आहे. युरोपातील हॅवेल्स माल्टा बीव्ही आणि हॅवेल्स एक्झिममधील हिस्साही कंपनी विकत आहे.
हॅवेल्स इंडियाने तिच्या विदेशातील हॅवेल्स नेदरलॅन्ड या उपकंपनीमार्फत सिल्व्हेनियाची वर्ष २००७ मध्ये ३० कोटी डॉलरच्या मोबदल्यात खरेदी केली होती. सिल्व्हेनियाच्या युरोप वगळता अमेरिका, ब्राझील, चिली आणि थायलंड येथील व्यवसायातील हॅवेल्सची भागीदारी मात्र कायम राहणार आहे.
सिल्व्हेनिया नाममुद्रेची स्वत:ची अनोखी ओळख असतानाही हॅवेल्स कंपनीने तिचा काळानुरूप विस्तार केल्याचे हॅवेल्स इंडियाचे संचालक अनिल राय गुप्ता यांनी सांगितले. याबाबतची विक्री व्यवहार फेब्रुवारी २०१६ पर्यंत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
उपकंपनीतील मोठा हिस्सा विकण्याच्या घोषणेनंतर हॅवेल्स इंडियाचा समभाग गुरुवारच्या व्यवहारात १० टक्क्यांपर्यंत उंचावला. दिवसअखेर त्याला बुधवारच्या तुलनेत ८.०५ टक्के अधिक भाव मिळाला. समभागाचे मूल्य सत्रअखेर ३०५.३५ रुपयांवर स्थिरावले.