18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

गुंतवणूक-संस्कृती वाढीला लावण्यास कटिबद्ध

दांडगा उत्साह, दृढ आत्मविश्वास आणि देशाच्या शेअर बाजाराच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या

सचिन रोहेकर, मुंबई | Updated: November 22, 2012 12:38 PM

दांडगा उत्साह, दृढ आत्मविश्वास आणि देशाच्या शेअर बाजाराच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याची महत्त्वाकांक्षा या ऐवजाच्या जोरावर नवागत एमसीएक्स-स्टॉक एक्स्चेंजने ठरविलेले आगामी १० वर्षांत एकूण समभागांमधील गुंतवणूकदार संख्या सध्याच्या तुलनेत पाच पटीने अधिक म्हणजे १० कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट अवघड भासत नाही. अलिकडेच सदस्य नोंदणी मोहिम यशस्वी करून, १८ नोव्हेंबरपासून देशातील या तिसऱ्या शेअर बाजारात प्रयोगात्मक उलाढालींना (मॉक ट्रेडिंग) सुरुवात झाली. हा प्रारंभिक अनुभव खूपच उत्साहवर्धक असल्याचे एमसीएक्स- एसएक्सचे संस्थापक आणि त्याचे प्रवर्तक असलेल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीज समूहाचे अध्यक्ष जिग्नेश शाह यांनी सांगितले.

जगभरात सर्वत्रच सध्याच्या वित्तीय अरिष्टाच्या धबडग्यात सत्वर जोखीम-व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनेक पदरी पारदर्शी रूप असलेल्या एक्स्चेंजेसच्या भूमिकेला मोठे महत्त्व मिळत असून, भारतासारख्या बाजार संस्कृतीचा प्रचंड अभाव असलेल्या देशात आपल्यासारख्या नव्या एक्स्चेंजेसना खासच महत्त्व आणि अमाप संधीही असल्याचे जिग्नेश शाह यांनी प्रस्थापित दोन एक्स्चेंजेसच्या भाऊगर्दीत नव्या एक्स्चेंजला हातपाय पसरायला वाव मिळेल काय, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. भारतात सरकार तसेच बाजार नियंत्रकांनी धोरणात्मक आघाडीवर भांडवली बाजाराच्या उत्कर्षांचा मार्ग जरूर दाखविला. परंतु दुर्दैवाने प्रस्थापित एक्स्चेंजेसच्या कर्मदारिद्र्यापायी आर्थिक सुधारणांच्या दोन दशकांनंतरही विद्यमान बाजाराच्या ढाच्याला वाढीच्या दृष्टीने मर्यादा पडलेल्या आहेत.

मग एमसीएक्स-एसएक्सकडून नवीन काय केले जाईल, या स्वाभाविक प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी सांगितले की, भांडवल निर्माण, कॉर्पोरेट रोखे बाजाराला प्राधान्य देण्याबरोबरीनेच उत्पादन नाविन्य आणि बाजाराची खोली व व्याप्ती वाढविण्याकडे जे आजवर दुर्लक्ष झाले त्यावरच प्रामुख्याने भर दिला जाईल. आजच्या घडीला काही मूठभर बडय़ा गुंतवणूकदारांचेच शेअर बाजारातील उलाढालींवर प्रभूत्व आहे ही दारुण वस्तुस्थिती संसदेत अलीकडेच विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

सध्याच्या बाजार ढाच्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची कटिबद्धता नेमकी कशी पूर्ण केली जाईल? या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी सांगितले, वांद्रे-कुर्ला संकुल व परिसरातून शेअर बाजाराला सर्वप्रथम देशाच्या काना-कोपऱ्यात नेले जाईल. गुंतवणूकयोग्य निधी असलेल्या सामान्य गुंतवणूकदाराला समजेल अशी उत्पादने आणून, त्याच्या नजीक उपलब्ध असलेल्या दालनातून त्याची गुंतवणूकही सहजसाध्य बनेल असे मध्यस्थांचे देशाच्या छोटी शहरे व नगरांमध्ये जाळे उभारण्यावर भर दिला जाईल.

जगातील सर्वात परिपक्व वित्तीय बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत तिथल्या ३० कोटी लोकसंख्येसाठी १० एक्स्चेंज आणि ७६ तत्सम उलाढाल मंच उपलब्ध आहेत. भारताची लोकसंख्या १२० कोटींहून अधिक आहे आणि येथे दोनापेक्षा अधिक शेअर बाजारांना वाव नाही असे कसे म्हणता येईल, असा शाह यांनी सवाल केला. ‘एमसीएक्स-एसएक्सने सदस्यनोंदणीच्या पहिल्या महिन्यातच नोंदविलेल्या ७०० ट्रेडिंग मेंबरपैकी १० टक्के हे व्यावसायिक तसेच ग्रामीण उद्यमी या वर्गवारीतील म्हणजे प्रथमच भांडवली बाजाराच्या संकल्पनेत सहभागी होत आहेत. आम्ही संकल्पिलेल्या नव्या गुंतवणूकदार वर्गापर्यंत पोहचण्याचे लक्ष्य बहुतांश या मंडळींकडून साकारले जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदार संख्येबाबत निश्चित केलेले १० वर्षांत १० कोटींचे लक्ष्य अजिबात अवास्तव नसल्याचे म्हणत शाह यांनी सर्व एक्स्चेंजेस, त्यांचे सदस्य व अन्य मध्यस्थ, डिपॉझिटरीज यांच्या एकत्रित प्रयत्नांचेच ते फलित ठरेल. चीनमध्ये आताच १६ कोटी गुंतवणूकदार आहेत. नेटाने प्रयत्न झाले तर आपल्याला त्याहून मोठी मजल मारता येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

(ई-मेलवर पाठविलेल्या प्रश्नांना आलेल्या उत्तरांच्या आधारे)

 

आगामी १० वर्षांत गुंतवणूकदार संख्या १० कोटीचे लक्ष्य अजिबात अवास्तव नाही. चीनमध्ये आताच १६ कोटी गुंतवणूकदार आहेत. नेटाने एकत्रित प्रयत्न झाले तर आपल्याला त्याहून मोठी मजल मारता येईल.

जिग्नेश शाह,

संस्थापक एमसीएक्स-एसएक्स

First Published on November 22, 2012 12:38 pm

Web Title: commited to improve investment culture