मुंबई : कंपन्यांच्या नफ्यात वाढ न होणे ही देशाच्या आर्थिक प्रगतीतील अडचण असल्याचे मत एसबीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नवनीत मुनोत यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. एसबीआय म्युच्युअल फंडातर्फे मुंबईत आयोजित वार्ताहर संवादात यांनी वरील मत व्यक्त केले.

मुनोत यावेळी म्हणाले की, अमेरिकेतील कंपन्यांनी २००८ च्या आर्थिक अरिष्टाचा यशस्वी सामना करण्यात अनुकूल आर्थिक धोरणे, कमी व्याज दर आणि सरकारने कमी केलेले करांचे प्रमाण यांचा मोठा वाटा आहे. अमेरिकन कंपन्यांना नफ्यात वृद्धीदर राखणे अनुकूल वातावरणामुळे शक्य झाले. जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून देखील, वाढत्या करांच्या बोज्यामुळे भारतीय कंपन्यांच्या नफ्यात वाढ दिसून आलेली नाही. जगभरात करांचे दर कमी होत असताना भारतात मात्र सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कर आकारणीत वाढ होताना दिसत आहे. कंपन्यांचा नफा वाढला तर कंपन्या भांडवली गुंतवणूक करतील.

मुनोत यांनी सांगितले की, २०१९च्या करांचे सकल राष्ट्रीय उत्पादनाशी प्रमाण १६ ते १७ टक्के आहे. १९८० च्या तुलनेत ४ टक्के अधिक असल्याने पायाभूत सुविधांच्या विकासावरील खर्च मर्यादित राहिला आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे करदात्यांची संख्या वाढली असली तरी कर दरात केलेल्या वाढीमुळे या सुधारणांचा फायदा होताना दिसत नाही.

त्वरित उपाययोजनांबाबत नवनीत मुनोत म्हणाले की, सरकारला भांडवली किंमत कमी करण्यासोबत गुंतवणूकदार समुदायाचा आत्मविश्वास त्वरित प्रस्तापित करणे काळाची गरज आहे. वस्त्रोद्योग, नागरी हवाई वाहतूक, वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या घटलेल्या उत्पादनाने देशासमोरील भीषण मंदीचे वास्तव आहे. निवडणुकीनंतर गुंतवणूकदार समुदाय कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याबाबत आशावादी होता; परंतु अर्थसंकल्पातील कर विषयक प्रतिकूल तरतुदींमुळे कंपन्यांच्या नफ्यातील वाढीबाबत साशंकता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार निराशेच्या गर्तेत आहे.