‘करोना’ संसर्गाच्या फटक्यातून दिलाशाची अपेक्षा

मुंबई : ‘करोना’ संसर्ग हे राष्ट्रीय संकट असून  येत्या काळात त्याचा जोरदार फटका आधीच मंदीत असलेल्या बांधकाम उद्योगाला बसणार आहे; त्यामुळे या उद्योगाला तात्काळ सवलती जाहीर करण्याची मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज’ म्हणजेच ‘एमसीएचआय-क्रेडाई’चे अध्यक्ष नयन शाह यांनी राज्य शासनाकडे केली आहे. चटईक्षेत्रफळापोटी भरावयाच्या शुल्कात कपात ते मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या रोगामुळे आता बांधकाम उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. या उद्योगाशी संबंधित रोजंदारीवर पूर्णपणे गदा आली आहे. त्यातून या उद्योगाला बाहेर पडण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शासनाने तात्काळ लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. या उद्योगाशी संबंधित सर्वांचे हित जपण्यासाठी या उद्योगातील प्रमुख संघटना असलेल्या ‘एमसीएचआय – क्रेडाई’मार्फत आम्ही शासनाला सुधारीत धोरण जाहीर करण्याची मागणी करीत आहोत, असे शाह यांनी म्हटले आहे.

सर्व विकासकांना महापालिका तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाकडे अदा करावयाच्या सर्व शुल्कातून पुढील वर्षभरासाठी सूट देण्यात यावी, या शिवाय या यंत्रणांना भरण्यात येणाऱ्या सर्व शुल्कांमध्ये पुढील पाच वर्षांंसाठी ७५ टक्के कपात करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

घरखरेदीदार तसेच विकासकांकडून कर्जापोटी भरण्यात येणारे हप्ते, त्यावरील व्याज यातही वर्षभरासाठी सवलत द्यावी, असे स्पष्ट करताना शाह यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने पुढील सहा महिन्यासाठी मुद्रांक शुल्क आणि मालमत्ता कर वर्षभरासाठी माफ करावा.