सोन्याचे भाव ५० हजारांचा आकडा पार करत असले तरी त्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने चोख सोने खरेदीबाबत ग्राहकांमध्ये अनुत्साहच असल्याचे दिसते. एरवी भाव वाढत असताना जितकी गुंतवणूक झाली असती त्या तुलनेत हे प्रमाण केवळ २० टक्के च असल्याचे अनेक सुवर्णपेढींनी सांगितले.

आपल्याकडील मानसिकतेनुसार एरवीदेखील गुंतवणूक म्हणून कमी अधिक प्रमाणात सोन्याची खरेदी सुरुच असते. अडीनडीला ताबडतोब आणि हमखास चार पैसे अधिक मिळवून देणारी गुंतवणूक आणि त्याचबरोबर दागिना असादेखील विचार भारतीय मानसिकतेत केला जातो. टाळेबंदीच्या काळात मार्चमध्ये सुमारे ४० ते ४२ हजार रुपये तोळावरुन सोन्याचा भाव एप्रिलमध्ये ४७ हजार रुपयांच्या आसपास गेला. त्यामध्ये थोडीफार वाढ होतच होती. मात्र जुलै महिन्यात हाच भाव ५१ हजार ५०० रुपये झाला.

‘सर्वसाधारणपणे दर वाढू लागला की चोख सोने खरेदी करण्याची मानसिकता असते. पण सध्या याबाबत प्रतिसाद अगदीच थंड असून केवळ २० टक्के च असल्याचे,’ एम. व्ही. पेंडुरकर अ‍ॅण्ड कंपनीचे अजित पेंडुरकर यांनी सांगितले. हौसेने सोने खरेदी करायला येण्याची मानसिकता सध्या नसल्याचे त्यांनी नमूद केले.

‘काही ग्राहक नियमितपणे दर महिन्याला एक-दोन ग्रॅम सोन्याचे वळे खरेदी करतात. सध्याच्या भीतीच्या वातावरणात ही खरेदीदेखील मंदावली असल्याचे,’ अष्टेकर ब्रदर्स सुर्वणरत्न पेढीचे नितीन अष्टेकर यांनी सांगितले. भाव वाढले म्हणून येणाऱ्यांची संख्या १० ते १५ टक्के  इतपतच असल्याचे त्यांनी सांगितले. ‘टाळेबंदीच्या शिथिलिकरणानंतर अद्यापही सोन्याची मागणी वाढली नसून, सध्याच्या अस्थिर वातावरणात असलेले पैसे राखून ठेवण्याकडे लोकांचा कल असल्याचे,’ लागू बंधू ज्वेलर्सचे दिलिप लागू यांनी सांगितले. सराफांकडे वर्षभराच्या बचत योजनेत गुंतवलेले पैसे वर्ष पूर्ण झाल्याने होणारी खरेदीच सध्या दिसत असल्याचे ते म्हणाले. नवीन खरेदीबाबत फारसा उत्साह दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षांतील सर्वात मोठा लग्नसराईचा मोसम हा टाळेबंदीमुळे हुकला आहे. अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. लग्नातील दागिन्यांसाठी पैसे बाजूला ठेवलेल्या ग्राहकांनी भाव अजून वाढतील या हिशोबाने आताच सोने खरेदी के ल्याचे निरीक्षण अनेक सुवर्णपेढीकारांनी मांडले. तर काही ठिकाणी लग्नाच्या गरजेनुसार नवेजुने करण्यासाठी थोडी वर्दळ दिसत आहे.

दुकाने सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी सोने मोडून पैसे उभे करण्याच्या घटनादेखील काही ठिकाणी घडल्याचे दुकानदारांनी सांगितले. मुख्यत: छोटे उद्योजक त्यांचा व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी असे हाताशी असलेले सोने विकण्यासाठी आल्याचे ते नमूद करतात. सध्या दुकाने उघडण्यास अनेक नियमांचा अडथळा असून, वाहतूक सुविधा सुरळीत नसल्याने एकूणच ग्राहकांचे प्रमाण रोडावल्याचे सुर्वणपेढीकारांनी सांगितले. पण दुसरीकडे सोन्याच्या बॉण्ड (पेपर गोल्ड) वगैरे प्रकारातील गुंतवणूकीसदेखील तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडे समोर येत आहेत.