अर्थव्यवस्थेच्या भवितव्याविषयी ३६ टक्के निराशावादी

मुंबई : इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नवमाध्यमांचा बोलबाला असताना, देशातील अब्जाधीश व कोटय़ाधीश मात्र आजही माहिती मिळविण्याचे साधन म्हणून मुद्रित माध्यमे व त्यातही वर्तमानपत्रांना प्राधान्य देतात, असे हुरून रिसर्च इन्स्टिटय़ूटकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

दरसाल हुरूनद्वारे प्रसिद्ध होणारी अतिश्रीमंताची यादी तसेच सर्वोत्तम जागतिक उत्पादन नाममुद्रा (ग्लोबल बेस्ट ब्रॅण्ड अ‍ॅवार्ड्स) सुपरिचित आहेत. परंतु यंदा मात्र पहिल्यांदाच अति उच्च धनसंपदा असणाऱ्या व्यक्तींमध्ये (अल्ट्रा एचएनआय) केलेल्या विस्तृत सर्वेक्षणाअंती ‘हुरून इंडियन लक्झरी कन्झ्युमर सव्‍‌र्हे २०१९’ नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. धनाढय़ांची जीवनशैली, त्यांच्या उपभोग सवयी, त्यांच्यामधील ऐषारामी ब्रॅण्ड्सचा पसंतीक्रम यांची ओळख करून देणाऱ्या अहवालात, माहितीचा स्रोत म्हणून वर्तमानपत्रांच्या पारडय़ात सर्वाधिक ३० टक्के मते, तर टीव्ही वाहिन्या १७.३ टक्के अशा खूप खाली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. समाजमाध्यमे (१५.४ टक्के) आणि व्हॉट्सअ‍ॅप (८.७ टक्के) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी, तर अन्य नवमाध्यमे, डिजिटल व मोबाइल अ‍ॅप यांना धनाढय़ांमध्ये दोन अंकी प्रमाणातही स्थान नसल्याचे हा अहवाल सांगतो. उल्लेखनीय म्हणजे फुरसतीच्या वेळेत विरंगुळा म्हणून या मंडळींमध्ये हिंडण्या-फिरण्याबरोबर (३८.१ टक्के), वाचन (१९.१ टक्के) हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अहवालातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे, आगामी तीन वर्षांत अर्थव्यवस्थेसंबंधी ३६ टक्के मंडळींचा दृष्टिकोन निराशावादी आहे, तर २४ टक्क्यांनी अर्थव्यवस्था भरभराटीची असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. विनिमयासाठी डेबिट/ क्रेडिट कार्डचा वापर ३९.८ टक्के लोक करतात, तर त्या खालोखाल रोख अर्थात नोटांद्वारे खरेदी विनिमय करणारे १६.५ टक्के आहेत. ई-बटवे (८.७ टक्के), यूपीआय अ‍ॅप (६.८ टक्के) यासारख्या डिजिटल साधनांचा वापर धनाढय़ांमध्येही अद्याप लक्षणीय प्रमाण गाठू शकलेले नाही.