अर्थव्यवस्थेच्या तिहेरी वेगाने पुनर्उभारणीची शक्यता दिसून येते. उद्योग क्षेत्रनिहाय वास्तविकतेनुरूप, वैयक्तिक क्षेत्र वेगवेगळ्या वेगाने वाढ दर्शवितील, असे नमूद करीत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारीची प्रक्रिया विशद केले.

विविध अर्थविश्लेषकांकडून सूचित ‘यू’, ‘व्ही’, ‘एल’, ‘डब्ल्यू’ अथवा ‘के’ या इंग्रजी आद्याक्षराच्या आकाराच्या अर्थउभारीच्या सिद्धांताऐवजी  दास यांनी सध्या सुरू ‘आयपीएल’चा हंगाम पाहता, क्रिकेटमधील खास संज्ञांचा यासाठी वापर केला. करोना आजारसाथीने सर्वाधिक बेजार उद्योग क्षेत्र किक्रेटमधील हाणामारीच्या षटकांप्रमाणे फलंदाजी करून डाव सुधारतील, असे ते म्हणाले.

जी उद्योग क्षेत्रे सर्वप्रथम खाते उघडून धावफलक हालता ठेवतील, त्यामध्ये साथीच्या संक्रमण काळातही तग धरून राहिलेल्या आणि मजूर-प्रवण क्षेत्रांचा समावेश असेल. अशी क्षेत्रे म्हणून त्यांनी शेती व शेतीपूरक उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, दुचाकी, प्रवासी वाहने, ट्रॅक्टर्स, औषधी व वीज निर्मिती या क्षेत्रांचा उल्लेख केला. दुसरा प्रवर्ग हा हरवलेला ‘फॉर्म’ अर्थात सूर लवकर गवसणाऱ्या क्षेत्रांचा असेल. तर करोना कहराचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना धावगती वेगाने वाढविण्यासाठी अंतिम षटकांमध्ये हाणामारी करणे भाग ठरेल, असे दास यांनी निरुपण केले.