मागणी-पुरवठय़ातील सुधारलेल्या संकेतांनी वर्षअखेर ६० डॉलपर्यंत वाढीचे कयास
खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील उताराला, उत्तरोत्तर सुधारत असलेल्या मागणी-पुरवठय़ातील संतुलनातून बांध लागल्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी सायंकाळी झालेल्या तेल निर्यातदार देशांची संघटना – ‘ओपेक’च्या बैठकीने दिले. परिणामी, शुक्रवारी लंडनच्या बाजारात व्यवहार होणाऱ्या ब्रेन्ट क्रूड तेलाच्या दराने प्रति पिंप ५० अमेरिकी डॉलरची पातळी ओलांडल्याचेही दिसून आले.
तेलाच्या बाजारपेठेत हिस्सा वाढविण्यासाठी सौदी अरब आणि इराणमध्ये चिघळू पाहत असलेल्या संघर्षांला शांत करण्यात आलेले यश हे व्हिएन्ना येथे पार पडलेल्या गुरुवारच्या ओपेक बैठकीचे सर्वात मोठे फलित मानले जात आहे. कतारचे ऊर्जामंत्री मोहम्मद अल-सदा यांनी म्हणूनच माध्यमांशी बोलताना, बाजारात आवश्यक संतुलन परतत असून, दुष्टचक्र दूर होत असल्याचा हा संकेत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सौदी अरबचे ऊर्जामंत्री खालिद अल-फलिह यांच्या मते, स्थिती अशीच सकारात्मक राहिली तर वर्षअखेर प्रति पिंप ६० डॉलरची पातळी गाठण्याचे कयास व्यक्त केले. पिंपामागे ५० डॉलरचा स्तर देखील उत्पादन खर्चाच्या तुलनेत असमाधानकारक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय आर्थिक र्निबध नुकतेच सैल झालेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचवेल अशा तऱ्हेने तेलाचे वारेमाप उत्पादन घेऊन ते बाजारात पडेल किमतीत न ओतण्याच्या भूमिकेला सौदी अरबकडून या बैठकीत सकारात्मकता दिसून आली आहे. शिवाय नायजेरिया, व्हेनेझुएला, लिबया आणि अमेरिका या अन्य तेल उत्पादक देशांकडूनही संतुलित पुरवठा राहील, असे प्रमुख विश्लेषकांचे कयास आहेत.
लंडनच्या बाजारातील शुक्रवारच्या प्रारंभीच्या व्यवहारात ब्रेन्ट क्रूडला प्रति पिंप ५०.०९ डॉलर किमतीवर व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. जानेवारी २०१६ मध्ये नोंदविलेल्या एका तपाच्या नीचांक स्तरावरून ते जवळपास दुप्पट झाले आहेत.
भारतासाठी दुहेरी आघात..
अमेरिका तसेच चीन व भारतातून वाढलेली मागणीही तेलाच्या किमतीच्या पथ्यावर पडली आहे. मात्र भारतासाठी अर्थव्यवस्थेच्या उभारीच्या दृष्टीने घसरलेल्या तेलाच्या किमती सुखावणाऱ्या ठरल्या होत्या. किमतींनी पुन्हा उसळी घेणे हे महागाई दरात वाढीसाठी कारण ठरेल. भारतात आजही ८५ टक्के इंधनाची गरज ही आयात होणाऱ्या खनिज तेलाद्वारे भागविली जाते. तेलाच्या भडक्यासह डॉलरचे मूल्यही वधारणे भारतासाठी दुहेरी आघात ठरेल.
तेलातील भडका दमदार पाऊस शांत करेल – सीआयआय
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीने पुन्हा प्रति पिंप ५० डॉलरपुढे उसळी घेणे चिंतेचे जरी असले तरी यंदा दमदार पाऊस झाल्यास अर्थव्यवस्थेला त्याची फारशी झळ सोसावी लागणार नाही, असा विश्वास उद्योगजगताची संघटना- भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय)ने शुक्रवारी व्यक्त केला. हवामान खात्याने यंदा पावसाने ओढ घेण्याची शक्यता शून्य टक्के असल्याचे गुरुवारीच स्पष्ट केले आहे.
गेले वर्ष- दीड वर्ष तेलाच्या घसरलेल्या किमतीचा आपल्याला खूप चांगला लाभ झाला आहे. आता किमती काहीशा वाढतील असे संकेत जरूर आहेत, पण वर्षभराच्या अवधीत त्या लक्षणीय उसळण्याची शक्यताही दिसून येत नाही, असे सीआयआयचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. देशात सर्वत्र पाऊस चांगला बरसल्यास, तेलातील किमतीतील किंचित वाढीने संभवणाऱ्या दुष्परिणामांना धुऊन काढले जाईल, असा त्यांचा कयास आहे. विशेषत: पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात गुंतवणुकीत दिसत असलेली वाढ आणि सरकारची आर्थिक सुधारणांबाबत बांधिलकी या गोष्टीही भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या ठरल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.