ऑक्टोबरमधील उच्चांकापासून २० टक्क्य़ांनी घसरण

सिंगापूर : वाढलेला पुरवठा आणि आर्थिक मंदीपायी घटलेल्या मागणीचा खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर अपेक्षित परिणाम दिसून येत असून, ऑक्टोबरच्या प्रारंभी असलेल्या चार वर्षांतील उच्चांकी किमतीत तब्बल २० टक्क्य़ांनी घसरण दिसून आली आहे. चालू वर्षांत एप्रिलनंतर प्रथमच तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी प्रति पिंप ७० डॉलरच्या खालची पातळी दाखविली आहे. आयातीत तेलावर बव्हंशी अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मात्र हा दिलासादायी घटनाक्रम आहे.

शुक्रवारी अमेरिकेतील बाजारातील खनिज तेलाच्या वायदा व्यवहार हे नरमलेले दिसून आले. डब्ल्यूटीआय क्रूड फ्युचर्सचे व्यवहार हे चार टक्क्य़ांच्या घसरणीसह प्रति पिंप ५९.२८ अमेरिकी डॉलर दराने सुरू होते. चालू वर्षांत फेब्रुवारीनंतरचा हा सर्वात कमी दराने झालेला हा सौदा आहे. तर भारतात प्रामुख्याने आयात होणाऱ्या लंडनच्या बाजारातील ब्रेन्ट क्रूडचे वायदा व्यवहार हे प्रति पिंप ६९.१३ डॉलरने सुरू होते. ऑक्टोबरमध्ये खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर चढल्या होत्या, त्या तुलनेत शुक्रवारचे डब्ल्यूटीआय आणि ब्रेन्ट क्रूडचे दर हे २० टक्क्यांनी घटले आहेत. कळसापासून तीव्र स्वरूपात झालेली ही किमतीत घसरण म्हणजे खनिज तेलाच्या वायदा बाजारातील मंदीच दर्शविणारीच असल्याचे प्रमुख विश्लेषकांचे म्हणणे असून, तेलाच्या किमतीत यापुढेही घसरणीचे त्यांचे कयास आहेत.

विश्लेषकांच्या मते, ब्रेन्ट क्रूडच्या किमतीत घसरण विस्तारत जाऊन त्या प्रति पिंप ६८.५० डॉलर इतके खाली येऊ शकतील. चालू वर्षांच्या एप्रिलपासून ब्रेन्ट क्रूड हे सातत्याने प्रति पिंप ७० डॉलरच्या वर राहिले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेने प्रमुख तेल निर्यातदार इराणवर चालू आठवडय़ापासून पूर्ण निर्बंध लागू केले असले तरी त्याचा एकूण तेल पुरवठय़ावर परिणाम दिसून आलेला नाही. तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना- ओपेकमधील सौदी अरबनंतरचा इराण हा दुसरा मोठा निर्यातदार देश आहे. एकंदर ओपेककडून तेल निर्यातीत वाढ सुरूच असून, त्यात उत्तरोत्तर नवीन भर पडत आहे. मात्र जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना मंदीने घेरलेले असण्याचा परिणाम मागणीवर दिसून येईल. ज्याचा परिणाम म्हणून किमती घटत जाणे अपरिहार्य असल्याचे विश्लेषकांचे कयास आहेत.

इराणच्या तेलाच्या निर्यातीवर अमेरिकेचे निर्बंध ५ नोव्हेंबरपासून लागू झाले असले तरी, पुढील सहा महिन्यांसाठी मोठय़ा आयातदार देशांना इराणकडून तेल आयातीची मुभाही अमेरिकेने दिली आहे. त्यामुळे आधी संकल्पिल्याप्रमाणे अमेरिकी र्निबधांचे एकूण तेल बाजारपेठेवर विपरित परिणाम दिसून येणार नाहीत. विश्लेषकांच्या मते, २०१८ सालच्या मध्यावर इराणमधून तेल निर्यातीची कमाल पातळी ३० लाख पिंप प्रति दिन होती, ती नोव्हेंबरपासून साधारण निम्म्यावर म्हणजे १५ लाख पिंप प्रति दिनावर येईल. मात्र ही तफावत भरून काढणारी उत्पादनातील वाढ सौदी अरब आणि अन्य ओपेक देशांकडून सुरू असल्याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.