‘नोटाबंदी-जीएसटी’ची जळमटे दूर..

निश्चलनीकरण आणि त्यापाठोपाठ वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नवीन करप्रणालीच्या अंमलबजावणीने व्यापारावर साधलेले तात्पुरते दुष्परिणाम सरत असल्याचे दिसून येत असून, प्रामुख्याने ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्र (एफएमसीजी) हे २०१८ सालात १२ ते १३ टक्के दराने विक्रीत वाढ दाखवू शकेल, असे अंदाजण्यात येत आहे. एप्रिल ते जून २०१८ तिमाहीत या उद्योग क्षेत्राने १०.९ टक्के वृद्धिदर अनुभवला, तर आधीच्या काही तिमाहीत त्याला दोन अंकी वाढ गाठणेही अवघड बनले होते.

ग्राहकांमधून बळावलेली मागणी आणि उपभोग तसेच ताज्या जीएसटी करकपातीच्या परिणामी अनेक वस्तूंच्या किमतीत झालेल्या घटीचा परिणाम जून तिमाहीत विक्री वाढण्यात दिसून आला आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रासाठी चालू वर्षांत हाच वृद्धिपथ कायम राहील, असा विश्वास बाजार सर्वेक्षणातील अग्रेसर कंपनी निल्सन इंडियाने व्यक्त केला. ग्राहकांनी खरेदीचा हात आखडता घेतला अशी बाजारात स्थिती होती, आता मात्र पुन्हा खरेदीला बहर आला असल्याचे दिसून येत आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेली बाजार अस्वस्थता संपुष्टात आली आहे. उलट जीएसटीमुळे एकूण बाजारप्रणालीत सक्रियता आणल्याचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत, असे मत निल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक समीर शुक्ला यांनी व्यक्त केले. येत्या काळात किमतीत घसरणीच्या दिशेने दिसणारा कोणताही बदल हा उपभोगाला चालना देणारा ठरेल. मात्र महागाई दरात वाढ ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रासाठी मारक ठरेल, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले. निल्सन इंडियाकडून बाजारपेठेतील ग्राहकांच्या मागणीसंबंधी अभ्यास अहवालाचे येथे प्रकाशन करण्यात आले.

धोरणात्मक बदलांच्या परिणामी ग्रामीण भारतातील मागणीवर मोठा विपरीत परिणाम साधला होता. त्यातही सरलेल्या जून तिमाहीत दमदारी उभारी दिसून आली आहे, असे या अहवालाचे निरीक्षण आहे. आता निश्चलनीकरणाच्या पूर्वीच्या स्थितीवर ग्रामीण बाजारपेठेतील मागणी पोहोचली असल्याचे अहवाल सांगतो.

आधुनिक किराणा व्यापाराचा वाढता वाटा

मॉल्स, सुपर मार्केट, हायपर मार्केट या आधुनिक पेठांचा ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या एकूण विक्रीतील वाटा अलीकडच्या तिमाहीत वाढून १० टक्क्य़ांवर पोहोचला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सूट-सवलतीचे दिवस/ सप्ताहांच्या आयोजनाने साधलेला हा परिणाम आहे. शिवाय, जीएसटीमुळे ब्रॅण्डेड आणि विनाब्रॅण्डच्या उत्पादनांच्या किमतीतील तफावत जवळपास संपुष्टात आल्याने ग्राहकांचा कल अर्थात ब्रॅण्डेड उत्पादनांकडे झुकला आहे, असे निल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक समीर शुक्ला यांनी सांगितले. याचप्रमाणे ‘नैसर्गिक’ असा शिक्का असलेल्या उत्पादनांनाही बिगर नैसर्गिक उत्पादनांच्या तुलनेत तीनपट अधिक मागणी आहे. नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीचे क्षेत्र हे भारतीय कंपन्यांनीच व्यापले असून, त्यांचा बाजारहिस्सा ८१ टक्क्यांच्या घरात आहे.