News Flash

अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन

मोदी सरकार कोषात गेले असल्याची टीका

(संग्रहित छायाचित्र)

 

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये एप्रिल—जून २०२० तिमाहीत दिसून आलेले २३.९ टक्कय़ांचे आकुंचन अत्यंत चिंताजनक असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आणि धोरणकर्ते व नोकरशहांनी आत्मसंतुष्ट वृत्तीला झटकून अर्थपूर्ण सक्रियता दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले.

सध्याचे संकट पाहता, सर्वंकष विचार आणि सक्रियतेने कामाला लागलेले सरकार असणे अत्यावश्यक आहे. परंतु दुर्दैवाने सुरुवातीला दिसून आलेला कामाचा धडाका थंडावला असून, सध्याचे सरकार कोषात गेलेले दिसते, अशी टिप्पणीही राजन यांनी केली.

विकासदरातील अत्यंत दारुण स्वरूपाची घसरण ही सर्वांसाठी भीतीदायी आहे. भारताच्या जीडीपी  २३.९ टक्कय़ांनी आक्रसला आहे (अनौपचारिक क्षेत्रावरील आघातांचा अदमास घेतल्यास हा आकडा कदाचित आणखी भयानक  असेल), तर विकसित राष्ट्रातील कोविड—१९ कहराने सर्वाधिक प्रभावित दोन राष्ट्रांपैकी  इटलीतील घसरणीची मात्रा १२.४ टक्के, अमेरिकेत हे प्रमाण ९.५ टक्के आहे.

आत्ममग्न असलेल्या नोकरशहांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे.  या संकटाचा मुकाबला म्हणून वर्तमान स्थितीत सरकारने फारसे काही करण्यास  अनुत्सुकता दर्शविली आहे, असे निरीक्षणही राजन यांनी नोंदविले. कदाचित भविष्यात आर्थिक प्रोत्साहन गरज लक्षात घेऊन संसाधनांची गरज जतन केली जात असावी. तथापि असे धोरण हे ‘आत्मघातकी‘ ठरेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

वर्तमानात सरकारकडून दिलासादायी पाठबळ आणि मदत खुली होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास अर्थव्यवस्थेला आणखी मोठा आघात पोहचविला जाईल, असा इशारा प्रख्यात अर्थतज्ज्ञ असलेले राजन यांनी दिला. ब्राझीलने मदतकामात मोठी रक्कम खर्च केली आणि म्हणूनच भारताच्या तुलनेत त्यांच्या अर्थ—अधोगतीचे प्रमाण कमी राहिल्याचे दिसून येते. भारतातील विषाणूजन्य साथीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर अर्थप्रोत्साहनाचे काम हाती घेण्याचा जर सरकार विचार करीत असेल, तर तोवर खूप उशीर झालेला असेल आणि पार खंगलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणे खूपच कठीण बनेल, असे राजन यांनी सरकारला उद्देशून सुनावले.

उदाहरणादाखल राजन म्हणाले, अर्थव्यवस्था जर रुग्णाईत आहे मानले, तर अर्थप्रोत्साहन हे रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत करणारे टॉनिक ठरते. पण ते जेव्हा गरज असते तेव्हा दिले नाही आणि रुग्ण जर उत्तरोत्तर कृश बनत गेला तर  त्यानंतर कोणतेही उत्तेजनात्मक औषधाची मात्रा निरुपयोगी ठरेल, असे राजन यांनी स्पष्ट केले.

साथीच्या प्रादुर्भावापूर्वीच अर्थव्यवस्थेचे मंदावलेपण स्पष्टपणे पुढे आले होते आणि सरकारच्या वित्तीय स्थितीवर तेव्हाच ताण दिसून येत होता. त्यामुळे आता प्रत्यक्ष संकटस्थितीत करोनाग्रस्तांना मदतीचा हात आणि अर्थप्रोत्साहक उपाय अशा दोन्ही गोष्टी एकसाथ करता येणार नाहीत, असे धोरणकर्त्यांंचे मत बनले असावे. तथापि ही अत्यंत नकारात्मक मानसिकता असल्याचे राजन यांनी सांगितले.

भारतात करोना कहर अद्याप सुरूच असून, परिणामी संपर्काच्या दाट असणाऱ्या उपाहारगृहांसारख्या सेवा त्रू्त तरी खुल्या होण्याच्या शक्यता दिसून येत नाही, त्या बरोबरीने त्या क्षेत्रातील रोजगारही तोवर बाधित राहील, असे राजन यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:19 am

Web Title: decline of the economy is worrisome raghuram rajan abn 97
Next Stories
1 व्होडाफोनची ‘आयडिया’: आता ‘या’ नावाने ओळखला जाणार नवा ब्रॅण्ड; मात्र ग्राहकांसाठी चिंतेची बातमी
2 सप्ताहाखेरही आपटीच
3 बाजार-साप्ताहिकी : घडामोडींचा परिणाम
Just Now!
X