|| प्रशांत त्रिपाठी

भारतीय आयुर्विमा उद्योगासाठी २०१९ हे वर्ष लक्षणीय ठरले. हे निवडणुकीचे वर्ष होते व त्यात सकल राष्ट्रीय उत्पादनातील किरकोळ वाढ, १.३५ टक्कय़ांनी कमी झालेले रेपो दर व घसरते व्याजदर तसेच दोलायमान शेअर बाजार अशा सर्व गोष्टी असतानाही आयुर्विमा उद्योगाने मात्र आपली वाढीची घोडदौड सुरू ठेवली.

याच वर्षांत भारतीय आयुर्विमा क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) ग्राहकांच्या दीर्घकालीन गरजा व त्यांचे हितरक्षण व त्यांना द्यावयाचे उत्तमोत्तम योजनांचे पर्याय या बाबी लक्षात घेऊन उत्पादन/योजना नियमावलीत काही सुधारणा केल्या व या सुधारणांच्या पर्वावर आता भारतीय आयुर्विमा उद्योग स्वार झाला आहे.

बदलत्या गरजांनुसार निधीचे नियोजन करण्याची लवचिकता आता ग्राहकांना मिळणार आहे. निवृत्तीवेतन तसेच अन्य निवृत्तीपश्चात लाभ देणाऱ्या योजना लागू झाल्या असून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेशी (नॅशनल पेन्शन स्कीम – एनपीएस) समकक्ष अशा या योजना असल्याने ग्राहकांना त्याचा अधिक लाभ होणार आहे. तसेच या योजनांनाही प्रतिसाद ग्राहकांकडून मिळणार आहे.

आयुर्मर्यादेत होणारी वाढ व अन्य कारणांमुळे भारत हा लवकरच जगातील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा देश म्हणून ओळखला जाईल. अशा परिस्थितीत आयुर्विमा उद्योगाच्या विस्ताराबरोबरच पेन्शन योजनांमधील अशा प्रागतिक बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सुवर्णकाळ सुरक्षित राखण्यास मदत होईल.

यावर्षी आयुर्विमा क्षेत्रात अधिकाधिक सकारात्मकता आणण्यासाठी भारतीय आयुर्विमा क्षेत्र एकत्र आले आहे. ‘लाइफ इन्शुरन्स कौन्सिल’ने हाती घेतलेली ‘सबसे पहले लाइफ इन्शुरन्स’ ही जागरूकता मोहीम अत्यंत अनोखी ठरली आणि आयुर्विमा या विषयाबाबत जागरूकता निर्माण करण्यात तिचे योगदान मोठे ठरत आहे.

‘आयआरडीए’ या विमाक्षेत्रासाठीच्या नियामक प्राधिकरणाने आणलेल्या नियामक नियमावलीमुळे (आयआरडीए रेग्युलेटरी सँडबॉक्स रेग्युलेशन्स २०१९) २०२० या वर्षांत या क्षेत्रात नव्या कल्पक योजना आकारास येणार असून नवीन ग्राहककेंद्री योजना तसेच सेवासुविधा यांच्या माध्यमातून आयुर्विमा उद्योगाला सशक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

गेल्या वर्षांत विमा उद्योगात आलेल्या तंत्रज्ञानामुळेीं१ ऋ कल्ल२४१ीळीूँ, 2019 असे त्याचे नामकरण करण्यात आले होते. या ‘इन्शुअरटेक’ वर्षांत अनेक विमा वितरक कंपन्यांनी एकमेकांशी सहकार्य करून सेवा देण्याचा नवा पायंडा पडला.

विविध विमा पुरवठादारांनी ‘इन्शुअरटेक स्टार्टअप्स’ तसेच कल्पक तोडगे सुचविणाऱ्या ‘हेल्पनर्चर’सारख्यांबरोबर संयुक्त सहकार्य केले. ‘इन्शुअरटेक’वरचा हा भर आगामी वर्षांत अधिक वाढेल आणि २४ बाय ७ म्हणजेच अहोरात्र व अखंडित तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कल्पक पुरवठादारांची संख्या वाढत जाईल. चॅटबॉट्स, सेल्फहेल्प वेब मॉडय़ुल्स, कल्पक डिजिटल सर्विस डेस्क यासारख्या नवउद्यमी प्रयत्नांचा ग्राहकांना लाभ होईल.

भारत आज जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश होण्यास सज्ज झाला आहे. भारतातील सरासरी वय २९ वर्षे असेल. तर या वयोगटात भारतातील ६० टक्के लोकसंख्या कार्यरत असेल. या लोकसंख्याविषयक वैशिष्टय़ामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आजवरचा सर्वात मोठी आघाडी मिळू शकेल आणि लोकसंख्येतून वाढीव लाभांश मिळू लागेल. ‘डिजिटायजेशन’ व ग्राहकांच्या गरजांचे सुयोग्य आकलन यामुळे ग्राहकांची जोडले जाणे सुकर होईल. तसेच भारताच्या विशाल लोकसंख्येत छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे हितरक्षण करण्याची सुरुवात होईल.

विमा उत्पादनांच्या विक्रीला ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता), ‘पॉवर्ड ऑटोमेशन’ व ‘बिग डेटा’ यांची जोड मिळाली तर या उद्योगात आणखी भविष्यवेधी उत्पादने निर्मिली जातील व विक्रीचे सक्षम जाळेही उभे राहील.

आव्हाने

या वर्षांत आयुर्विमा हे विक्रेते किंवा वितरकांसाठी एक आकर्षक करिअर म्हणून तयार करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. या विक्रेते-वितरकांनाही डिजिटल सेवादृष्टय़ा सक्षम करावे लागेल. त्याद्वारेच त्यांचे स्थित्यंतर विमा वितरकांकडून ग्राहकांचे विश्वासार्ह वित्तीय सल्लागार म्हणून व्हावे लागेल.

भारतीय विमा उद्योग आता एका भरारीच्या उंबरठय़ावर उभा आहे, त्यात वाढीची अपार क्षमता आहे, नेमक्या अशा वेळीच या क्षेत्राला अंतिम टोकापर्यंतच्या ग्राहकालाही सामावून घेण्यासाठी एक खंबीर पाऊल उचलावे लागेल व त्याद्वारे ‘आयुर्विमा सर्वांसाठी’ हा दृष्टिसंकल्प पोहोचवावा लागेल.

लेखक ‘मॅक्स लाइफ इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.