मॉल्स, हॉटेल्ससह विविध सेवा दालने खुली झाल्याचा इच्छित सुपरिणाम

देशाचे सेवा क्षेत्र मरगळ झटकून ऑगस्ट महिन्यात लक्षणीय स्वरूपात सक्रिय झाल्याचे मासिक सर्वेक्षणातून आढळून आले आहे. व्यवसायांकडे नव्याने आलेला कामांचा ओघ आणि निर्माण झालेली मागणीपूरक अनुकूलता ही गत १८ महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठणारी राहिल्याचे दिसून आले.

करोना टाळेबंदीतील शिथिलतेसह बहुतांश व्यवसायांवरील प्रतिबंध दूर झाल्याचा सुपरिणाम सेवा क्षेत्राबाबत या महिन्यासाठी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने दाखवून दिले आहे. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सव्र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑगस्टमध्ये ५६.७ असा नोंदला गेला आहे. जुलै महिन्यात हा निर्देशांक ४५.४ गुणांवर होता. या निर्देशांकाने गत १८ महिन्यांतील गाठलेला उच्चांक उपाहारगृहे, मॉल्ससह अनेक सेवा व्यवसायांची दालने खुली झाल्याची आणि ग्राहकांची वर्दळ व मागणीही वाढल्याचे सुस्पष्ट द्योतक आहे. किंबहुना, त्याने करोनाच्या आघातापूर्वीच्या पातळीवर फेर धरल्याचे हे आश्वासक वळण सूचित करते.  पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

देशात लसीकरणाचा वेग वाढल्याने अनेक आस्थापने खुली झाल्याने व्यावसायिकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे सलग तीन महिन्यांत सुरू असलेली घसरण थांबली असून आणि सेवा क्षेत्राचा पीएमआय १८ महिन्यांतील उच्चांकी स्तरावर म्हणजे करोना-पूर्वपदावर पोहोचला आहे. नवीन मिळणाऱ्या निर्यातीच्या मागण्यांमध्ये घट झाली असली तरी देशांतर्गत व्यवसायांना नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ आगामी काळ उज्ज्वल असल्याचे दाखविते, असे मत आयएचएस मार्किट इंडियाच्या अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी व्यक्त केले.

गतिमान लसीकरणासह, करोना टाळेबंदीमध्ये शिथिलतेत वाढ कायम राहिली आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा तडाखा रोखला गेल्यास अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेताना दिसेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.