News Flash

मुद्रांक शुल्क पुन्हा दोन टक्के करण्याची मागणी

डिसेंबर २०२० मध्ये १९ हजार ५८१ तर मार्च २०२१ मध्ये १७ हजार ४४९ घरांची विक्री झाली होती

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला असून त्यातच एप्रिल-मे महिन्यांत घरांच्या विक्रीलाही खीळ बसली. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा घर खरेदीकडे वळविण्यासाठी मुद्रांक शुल्कात पुन्हा कपात करून ती ३१ मार्च २०२२ पर्यंत दोन टक्के करावी, अशी मागणी विकासकांच्या संघटनेकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे.

बांधकाम व्यवसायाला उभारी यायची असल्यास शासनाला ही सवलत द्यावीच लागेल, असे या संघटनेने शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज (एमसीएचआय) – कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ने म्हटले आहे की, करोनाच्या पहिल्या लाटेतून बांधकाम व्यवसाय सावरला जावा, यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही तशीच परिस्थिती आहे. ग्राहकांना घरखरेदीसाठी प्रवृत्त केले गेले तर विकासकांची रोकडटंचाई दूर होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घरांची मुंबईत विक्रमी विक्री झाली होती. कधी नव्हे तो दहा हजारचा टप्पा काही दिवसांत पार केला होता. मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत झालेल्या घरखरेदीची आकडेवारीने विकासक खुश झाले होते. डिसेंबर २०२० मध्ये १९ हजार ५८१ तर मार्च २०२१ मध्ये १७ हजार ४४९ घरांची विक्री झाली होती. एप्रिल २०२१ मध्येही दहा हजार घरांची विक्री झाली. मात्र मे महिन्यात हा आकडा खाली घसरला. तो आणखी खाली घसरेल अशी भीती विकासकांना वाटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 4:16 am

Web Title: developers demand for two percent stamp duty again zws 70
Next Stories
1 wholesale inflation in may : महागाई नियंत्रणाबाहेर
2 अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची घसरण
3 सेन्सेक्स, निफ्टीचे विक्रमी सातत्य कायम
Just Now!
X