२०२२ पर्यंत सर्वासाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षेला रूप देणाऱ्या योजनेचे स्थावर मालमत्ता क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. यामुळे गृहनिर्माण व त्याच्याशी निगडित पायाभूत सेवा तसेच गृह वित्त आदी क्षेत्रालाही भरभराट प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ‘स्मार्ट शहरे’, ‘अमृत’ आणि ‘सर्वासाठी घरे’ या तीन योजनांना मूर्त रूप देण्यासाठी येत्या तीन वर्षांत ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. सात वर्षांमध्ये नवीन २ कोटी घरे या मोहिमेंतर्गत उभारली जाणार आहेत.
ल्ल  या योजना म्हणजे निर्णयक्षम पाऊल असून त्याचा लाभ निगडित २५० हून अधिक उद्योगांना होईल. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची वाढ, तर रोजगारात ३४ लाख रोजगार निर्मिती होऊ शकेल.
– राणा कपूर, अध्यक्ष, असोचेम.

*  योजनांच्या शुभारंभामुळे एकूणच उद्योगांमध्ये आशावादी वातावरणनिर्मिती झाली असून यामुळे शहरी भागातील जीवनमान उंचावण्यास सहकार्य होईल.
– सुमित मझुमदार, अध्यक्ष, सीआयआय.

* शहरी भागातील नागरिकांना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थावर मालमत्ता क्षेत्राला बळकटी आणण्याचा प्रयत्न या योजनांमधून केला गेला आहे.
– राजेश प्रजापती, प्रजापती कन्स्ट्रक्शन्स

* गृहनिर्माण क्षेत्रासाठी एकदम तीन नव्या योजना सादर करून पंतप्रधानांनी पायाभूत सेवा क्षेत्राप्रति असलेली आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. या योजना म्हणजे काळाचीच गरज आहे.
– सुमित जैन, कॉमनफ्लोअर.कॉम