नव्या पिढीच्या खासगी जीवन विमा कंपनी सुद लाइफमधील आपला हिस्सा वाढीसाठी मूळची जपानमधील दाय-इची लाइफ कंपनी उत्सुक असून याबाबतची चर्चा प्रगतिपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुद लाइफ (स्टार युनियन दाय-इची)मध्ये दाय-इची लाइफसह देशातील बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही भागीदार आहेत. त्यात बँक ऑफ इंडियाचा जवळपास निम्मा, ४८ टक्के हिस्सा असून युनियन बँक ऑफ इंडिया व डाय-इची लाइफ प्रत्येकी २६ टक्के हिस्सा राखून आहेत.
भारतातील विमा कंपनीत हिस्सा वाढीसाठी दाय-इची लाइफ प्रयत्नशील असून याबाबत अंतर्गत भागीदारांमध्ये चर्चा सुरू असल्याचे जपानच्या दाय-इची लाइफचे अध्यक्ष कोइचिरो वातानबे यांनी मंगळवारी येथे सांगितले. हिस्सा खरेदीसाठी समभाग प्रमाण व त्याचे मूल्य याबाबत विचारविमर्श सुरू असून लवकरच त्याबाबत अधिक स्पष्टता येईल, असेही ते म्हणाले.
भारतात विमा क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी आहे. त्यासाठी दाय-इची लाइफ हा हिस्सा ४४ टक्क्यांवर नेण्याच्या तयारीत आहे. बँक ऑफ इंडियानेही हिस्सा कमी करण्याची मानसिकता दर्शविली असून हे प्रमाण ३० टक्क्यांवर आणण्याचे धोरण आहे.
असे झाल्यास बँक ऑफ इंडियाचा विक्री हिस्सा दाय-इची लाइफकडे येईल. युनियन बँक ऑफ इंडियाची २६ टक्क्यांची भागीदारी मात्र कायम असेल.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या सहा-सात वर्षांत स्थापन झालेल्या विमा कंपन्यांमध्ये सुद लाइफने उल्लेखनीय प्रगती केली असून तीन वर्षांत सरासरी २५ टक्के व्यवसायवाढ नोंदविली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने प्रथमच नफा (१२.८७ कोटी रुपये) राखला आहे.