देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिनेश खरा यांनी बुधवारपासून हाती घेतली. मावळते अध्यक्ष रजनीश कुमार यांचा कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात आल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांच्या जागी खरा यांची नियुक्तीची घोषणा रात्री उशिरा केली.

अध्यक्ष म्हणून पदभार हाती घेताच, खरा यांनी पत्रकारांशी बोलताना आपले अग्रक्रम स्पष्ट केले. बँकेच्या ताळेबंदाच्या गुणवत्तेला अग्रक्रम देताना, कर्ज वितरण उच्चतम दर्जाचे राखण्याशी कटिबद्धतेची त्यांनी ग्वाही दिली. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षितता आणि हितरक्षणावर त्यांचे लक्ष केंद्रित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खरा यांची अध्यक्षपदी नियुक्ती ७ ऑक्टोबर २०२० पासून तीन वर्षे कालावधीसाठी करण्यात आली आहे. या नव्या भूमिकेआधी ते स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (जागतिक बँकिंग आणि साहाय्यक कंपन्या) असा पदभार सांभाळून होते. बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील तब्बल साडेतीन दशकांचा समृद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसाय अर्थात एसबीआय फंड्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिली आहे.