सलग पाच दिवसांच्या घसरणीला खंड पाडत भारतीय चलन रुपयाने मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल ३२ पैशांनी मुसंडी मारत, प्रति डॉलर ५६.४४ अशी पातळी पुन्हा प्राप्त केली. त्याआधी पाच दिवस सलग घसरणीने रुपया प्रति डॉलर १२० पैशांची लोळण घेत ११ महिन्यांच्या नीचांकाची वाट धरली होती.
विदेशी वित्तसंस्थांकडून भांडवली बाजारातील गुंतवणुकीने आणि निर्यातदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या ओघामुळे, विदेशी चलनाच्या आंतरबँक व्यवहारात रुपयाला आज मजबुती मिळताना दिसली. शिवाय केंद्र सरकारकडून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांसाठी सरकारी रोख्यांबाबत असलेल्या पाच अब्ज डॉलरच्या कमाल मर्यादेत वाढ केली जाईल, अशा संकेतानेही चलन बाजारात रुपयाला आज चांगला आधार दिला.
रुपयातील ताजी घसरण पाहता तो लवकरच प्रति डॉलर ५७.३२ अशी सार्वकालिक नीचांक पातळी गाठेल, असा विश्लेषक कयास व्यक्त करीत होते. गेल्या वर्षी जूनअखेरीस रुपया या नीचांक पातळीकडे अवनत झाला होता.
शेअर बाजारात मात्र घसरण सुरूच!
भांडवली बाजारात मात्र गुंतवणूकदारांनी वध-घटीच्या सत्रात मंगळवारी दिवसअखेर नफावसुली केल्याने दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तथापि बाजारात काही चांगल्या समभागात मूल्यात्मक खरेदीही गुंतवणूकदारांकडून सुरू असल्याचे दिसून आले. विशेषत: औषधी उद्योगातील कॅडिला हेल्थकेअर, डॉ. रेड्डीज् लॅब, अपोलो हॉस्पिटल्स या समभागांनी पडत्या बाजारातही ५ ते ५.५ टक्क्यांची कमाई केली. बरोबरीनेच बाटा इंडिया ताज्या विस्तार योजनेला पसंती दाखवून या समभागाच्या खरेदीला जोर चढला आणि परिणामी समभाग ६.६ टक्क्यांनी वधारला.