20 October 2019

News Flash

औषध निर्मिती क्षेत्राच्या नफाक्षमतेत उभारी अपेक्षित

भारतीय औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्राची मागील आर्थिक वर्षांत उलाढाल ३३ अब्ज डॉलर्सची होती

मुंबई : औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या नफाक्षमतेत वाढ दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०१८ च्या चौथ्या तिमाहीत औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात ७.४ टक्के वाढ झाली असून, हे क्षेत्र चार वर्षांनंतर कात टाकत असून या क्षेत्रातील परिचालन उत्सर्जनात आणि परिचालित नफ्यात वाढ होताना दिसत आहे, असे या क्षेत्राशी संबंधित गोलमेज परिषदेत अर्नस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीने सकारात्मक सादरीकरण केले.

भारतीय औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्राची मागील आर्थिक वर्षांत उलाढाल ३३ अब्ज डॉलर्सची होती. भारताच्या निर्यातीत औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारतीय औषध निर्मिती आणि आरोग्य निगा उद्योग मागील दोन वर्षे अनेक अडचणींचा सामना करीत होता. या अडचणी मुखत्वे अमेरिकेच्या नियामकांनी काही विशिष्ट कारखान्यांत काही औषधांच्या निर्मितीवर बंदी घातल्याच्या परिणाम निर्यातीत घसरणीमुळे आहेत.

भारत सरकारने औषधी कंपन्यांच्या नफेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी काही औषधांचा समावेश जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश करून या औषधांच्या किमतीवर रोख लावला. परिणामी आर्थिक वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात ८.३ टक्के घट झाली. औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन मागील अनेक वर्षांच्या तळाला आले आहे. अमेरिकेच्या नियामकांनी बंदी घातलेल्या कारखान्यांनी सुधारात्मक उपाययोजना केल्यामुळे बंदी घातलेल्या औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या काही उत्पादनांना उत्पादन करण्यास मान्यता मिळाली. टप्प्याटप्प्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा या अहवालाचा आशावाद आहे.

‘सीपीएचआय वार्षिक उद्योग अहवाल २०१८’नुसार, या क्षेत्रात अमेरिका व चीननंतर भारत सर्वात वेगवान वाढीची क्षमता असलेला देश आहे. ही वाढ मुख्यत: देशांतर्गत आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे असेल असे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, संशोधनात्मक पातळीवर अमेरिका, जपान आणि जर्मनी हे देश पहिल्या तीन क्रमांकावर असून भारत सहाव्या क्रमांकावर आहे. भारत जगभरातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्माता असून जगातील खपापैकी विविध प्रकारच्या ५० टक्के लसींचे उत्पादन भारतात होते. अमेरिकेतील एकूण औषधांच्या खपापैकी ४० टक्के तर इंग्लंडमधील औषधांच्या खपापैकी २५ टक्के औषधे भारतात तयार झालेली असतात.

मूल्यांकन आकर्षक पातळीवर..

सर्वसाधारणपणे भांडवली बाजाराच्या निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्राचा सात ते आठ टक्के या दरम्यान प्रभाव असल्याने बहुतांश डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडाची औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रात ७-८ टक्के गुंतवणूक असते. २०१४ ते २०१५ दरम्यान औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी अव्वल परतावा दिला होता. औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांचे सध्याचे मूल्यांकन नव्या गुंतवणुकीसाठी आकर्षक असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मितीसाठी या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षक ठरेल. गुंतवणूकदारांनी नव्याने दाखल झालेल्या आयडीबीआय हेल्थकेअर फंडात गुंतवणूक करावी, अशीही विश्लेषकांची शिफारस आहे.

First Published on April 25, 2019 1:22 am

Web Title: drugs companies in india profit expected to rise in the quarter ended march