करदात्यांसाठी महत्त्वाचे असलेले पॅनकार्ड आता चार तासांमध्ये मिळणार आहे. सध्या पॅन कार्डसाठी किमान १० दिवसाचा कालावधी लागतो. आता आगामी काळात अवघ्या चार तासांत ई- पॅन दिले जाईल आणि त्यादृष्टीने यंत्रणाही कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी दिली.

मंगळवारी दिल्लीत सुशील चंद्र यांनी करसंकलन आणि पॅन कार्डबाबत माहिती दिली. पॅनकार्डबाबत ते म्हणाले, वर्षभरात चार तासांमध्ये पॅन कार्ड देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि ओळख पटवून झाल्यावर चार तासांच्या अवधीत ई पॅन दिले जाईल. यासाठी वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर निर्धारण वर्ष २०१८-१९ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्येत तब्बल ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसून येत असून, एकूण ६.०८ कोटी विवरणपत्रे करदात्यांनी भरल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षांत, वस्तू आणि सेवा करातून अपेक्षेपेक्षा कमी महसूल येणार असला तरी, प्रत्यक्ष कराचे ११.५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास चंद्र यांनी व्यक्त केला. प्रत्यक्ष कर महसुलात १६.५ टक्क्यांचा वृद्धिदर तर एकंदर कर महसुलात १४.५ टक्के दराने वाढ दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

कर विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांच्या संख्येत आधीच्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्के वाढीसह, परतावा (रिफंड)चे प्रमाणही ५० टक्के वाढून २.२७ कोटी रुपयांवर गेले असल्याची त्यांनी माहिती दिली.